वाढदिवस साजरा करू नका ; रक्तदान,प्लाझ्मा दान शिबिरे आयोजित करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र राज्यात असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक,भित्तीपत्रके लाऊ नये त्या ऐवजी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान प्लाझ्मा दान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

 शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा येत्या २७ जुलै रोजी वाढदिवस असून,शिवसैनिक राज्यातील विविध भागात मोठ्या उत्साहात विविध उपक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करतात.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येवून राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा विराजमान झाल्याने या वाढदिवसाला  विशेष महत्व होते. मात्र राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये.तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे.आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले.

२७ जुलैस आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये असेही मुख्यमंत्री म्हणतात.गेल्या ४ महिन्यांभपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही, उलटपक्षी आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान ,प्लाझ्मा दान करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Previous articleसरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा केविलवाणा प्रयत्न
Next articleMedical Exam : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको