अजित पवार नाराज;महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : पार्थ पवारांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज होतील.तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद आणि बंडाळी मुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचे काही खरे नसून,श्रीगणेश विसर्जनानंतर  महाविकास आघाडी सरकारचे लवकरच विसर्जन होईल असे भाकित रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तविले आहे.

पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी हे भाकित वर्तविले आहे. बॉलिवूड मधील निर्माते दिग्दर्शक कलाकार चांगले असले तरी काही प्रमाणात  कलाकारांवर अन्याय होतो.अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराला ही सुरुवातीला प्रचंड संघर्ष करावा लागला त्यानंतर ते बिगबी झाले. त्यामुळे सुशांत सिंह या कलाकारावर अन्याय झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय द्वारे  झाली पाहिजे. अशी आम्ही मागणी केली होती.मुंबई पोलीसांचा जगात नावलौकिक आहे.त्यातुलनेत सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेगवान झालेला  नाही. त्यामुळे पार्थ पवार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची केलेली मागणी रास्त आहे. या पूर्वीही अनेक प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.त्याचा अर्थ आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही असा होत नाही.मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. पण एखादे प्रकरण सीबीआय चौकशीसाठी द्यावे ही मागणी करणे म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखविणे असा होत  नाही.त्यामुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे असेही आठवले म्हणाले.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षात अंतर्गत वाद आहेत. पार्थ पवार बाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार ही नाराज झाले आहेत.तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार चे लवकरच विसर्जन होईल अशी शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडी च्या कंपूत भीती आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याआधी केंद्र सरकार पडेल असे असबंध विधान केले. सामना वृत्तपत्र चालविणे सोपे आहे मात्र नरेंद्र मोदींशी सामना करणे त्यांना जमणार नाही. केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार मजबूत बहुमत असणारे सरकार आहे. या सरकारला धोका  नाही तसेच २०२४ च्या ही निवडणुका मोदी सरकार जिंकेल असा विश्वास  आठवले यांनी व्यक्त केला.

Previous articleचाकरमान्यांना टोल माफ मात्र कोरोनाची चाचणी आणि ई-पास बंधनकारक
Next articleमोठा निर्णय : आता MPSC ची परीक्षा विभागीय केंद्रांवर होणार