मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला आहे.या पार्श्वभूमीवर नियमांमध्ये शिथिलता देत राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पासची अट रद्द केली आहे. शिवाय मध्य रेल्वेनेही आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी दिली आहे.त्यासाठी उद्या म्हणजेच २ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू केले जात असल्याची माहिती मध्य रेल्वे दिली आहे. या संदर्भातील पत्रक मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या पत्रकानुसार, पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम म्हणजे आरक्षण पद्धतीने प्रवाशांना २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासासाठी बुकिंग करता येणार आहे. कोरोनामुळे राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाउन पुकारण्यात आला होता. तर आता हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील अनलॉकसाठी नवी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची अट रद्द केल्याची घोषणा सरकारने केली. जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ई-पासची अट रद्द करावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. अखेर सरकारने ही मागणी मान्य करत नागरीकांना दिलासा दिला आहे.
तसेच केंद्र सरकारने मेट्रो रेल्वे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात आणखी महिनाभर मेट्रो बंदच राहणार आहे. तर दुसरीकडे मुंबईत लोकल सेवा ही केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठीच सुरू आहे. सर्व नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत अदयाप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान, मध्य रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासासाठी दिलेल्या परवानगीमुळे नागरिकांना आता सहजरित्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार आहे.