मुंबई नगरी टीम
अहमदनगर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात गेल्या तीन महिन्यांपासून नवनवे ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. नुकताच ‘एम्स’ रुग्णालयाचा अहवाल समोर आला असून त्यात सुशांतच्या हत्येचा दावा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा करणारे या अहवालामुळे चांगलेच तोंडावर आपटले आहेत. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तसेच महाराष्ट्र आणि पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.
“बिहार निवडणुकीसाठी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर जाहीर माफी मागावी”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात ट्वीट करत त्यांनी विरोधकांना टोला हाणला आहे. तसेच सत्यमेव जयते असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुशांत प्रकरणाचे कसे राजकारण केले जात आहे याबाबत आधीही रोहित पवारांनी भाष्य केले होते.
सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न एम्स रुग्णालयाकडून सुरू होता. त्यानुसार एम्सच्या टीमने पोस्टमार्टम व व्हिसेरा रिपोर्टचा अभ्यास करून तो अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. या अहवालामध्ये हत्येचा दावा फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केली यावर शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे एम्सकडून आलेल्या या माहितीनंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर गेल्या तीन महिन्यांत अनेक नवनव्या गोष्टी समोर आल्या. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवाय महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे नाव देखील या प्रकरणात जोडण्यात आल्याने याला राजकीय वळण लागले होते. यात प्रामुख्याने भाजप नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरत सरकारवर टीका केली होती. मात्र आता एम्सच्या अहवालानंतर महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर टीका करणारे चांगलेच तोंडघशी पडले आहेत.