राज्य शिखर बँक घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चीट

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चीट मिळाली आहे.मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह आणखी ६९ जणांना देखील क्लीन चीट दिली आहे.मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकरणातील अजित पवार यांच्यासह ६९ जणांना दिलासा मिळाला आहे.

२५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता.२०११ मध्ये आरबीआयने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश होता.त्यानुसार ७० जणांवर कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५, आणि ४६७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून राज्य शिखर बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते. घोटाळ्यावेळी संबंधित मंत्री आणि बँकेचे सर्व अधिकाऱ्यांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली होती. अशा एकूण ३०० हून अधिक जणांची नावे यात आहेत.

Previous articleबलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : रामदास आठवले
Next articleसातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही :शंभूराज देसाई