मुंबई नगरी टीम
जळगाव : माजी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांना अज्ञात फोन आला असून त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.जामनेरमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान गिरीश महाजन यांच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा फोन आला होता.केवळ गिरीश महाजन नव्हे तर भाजप नेते आशिष शेलार यांनाही मंगळवारी रात्री १० वेळा धमकीचे फोन आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांना देखील असेच धमकीचे फोन आले होते. त्यानंतर आता राज्यातील भाजप नेत्यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे.
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जी. एस फाउंडेशनतर्फे ग्लोबल रुग्णालयाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना एक फोन आला होता. यामध्ये गिरीश महाजन यांना एक कोटी देण्यास सांगा अन्यथा बॉम्बने उडवू,अशी धमकी यावेळी देण्यात आली. त्यानंतर धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने मेसेज करून सायंकाळी पाच वाजता स्फोट घडवून देण्याची पुन्हा धमकी दिली. धमकीच्या या फोनमुळे एकच खळबळ उडाली असून अज्ञात व्यक्तीविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गिरीश महाजन यांच्यासह आशिष शेलार यांनाही मंगळवारी धमकीचे फोन आल्याची माहिती समोर आली आहे. आशिष शेलार यांना धमकीचे दहा फोन आले होते. फोन करणाऱ्या या अज्ञातांना आज पोलिसांनी मुंब्र्यातून अटक केली आहे. दरम्यान, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आले होते. या नेत्यांना धमकी देणा-याला पोलिसांनी कोलकात्यातून अटक केली होती.