इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”,राणेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावर राज्यपालांना खरमरीत पत्र लिहित उत्तर दिले.यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून नवा वाद सुरू झाला आहे. यावरूनच भाजप आता आक्रमक झाली असून राज्यपालांना अशा शब्दांत उत्तर दिल्याने त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाण साधत इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तार, असा टोला लगावला आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही टीका केली असून, यावेळी त्यांनी एक संदर्भ देत स्क्रीनशॉट शेअर केला आहे. “धर्मनिरपेक्षता संपली आहे, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा”, अशा मथळ्याखाली संजय राऊत यांचा उल्लेख आहे.याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. “यावरही उत्तर द्यावेसे वाटत नाही का ?… मिस्टर सीएम ? की, नेहमीप्रमाणे हे फक्त राजकारण होते. इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
राज्यातील मंदिरे खुली करण्याचा मुद्दा जोर धरू लागलेला असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. या पत्रात राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपण मंदिरे खुली करण्याबाबत विचाराधीन असल्याचे सांगितले. तसेच आपल्या हिंदुत्वाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असेही उद्धव ठाकरेंनी सुनावले. राज्यपालांना अशा शब्दांत उत्तर दिल्याने भाजप नेते चांगलेच खवळले असून ते उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा शिवसेना आणि भाजप असा रंगलेला पाहायला मिळत आहे.

Previous articleठाकरे सरकारचा मोठा निर्णय : उद्यापासून मेट्रो,आठवडी बाजार,ग्रंथालये सुरु होणार
Next articleमाजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ