मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे.याबाबत राष्ट्र्वादीकडून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असून, घनस्थापनेच्या मुहूर्तावर एकनाथ खडसे पक्षप्रवेश करणार असून त्यांना आमदारकीसह मंत्रीपद दिले जाणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केला आहे.
उदयसिंग पाडवी म्हणाले,”गेल्या सोमवारी मी मुक्ताईनगरला गेलो होतो.नुकतेच साहेब मुंबईहून परत आले होते.मुंबईत काय घडले याबाबत माझ्या मनात उत्सुकता होती.एकनाथ खडसे यांची मुंबईला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा होणार,याची मला पूर्ण कल्पना होती. तत्पूर्वी मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याआधी एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी जाण्याचा सल्ला दिला. तिथेच माझे पुनर्वसन होईल, असे त्यांनी सांगितले.त्यांच्या आदेशानेच मी ९ सप्टेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश केला”, असे उदयसिंग पाडवी यांनी सांगितले.
“मुंबईहून परत आल्यानंतर काही आनंदाची बातमी आणली का ? यावर एकनाथ खडसे हे मिश्किल हसले आणि म्हणाले, सगळी पॉझिटिव्ह चर्चा झाली.उहापोह सगळा झालेला आहे आणि निश्चितपणे आपण या आठ दिवसांत कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार.राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा जो कोटा आहे. त्यापैकी चार ते पाच आमदार राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिले जाणार आहेत. यामध्ये एक नाव शंभर टक्के एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीच्या यादीत असणार आहे. त्यांच्या उंचीप्रमाणेच त्यांना मानाचे पद पक्षात आणि मंत्रिमंडळात स्थान सुद्धा दिले जाण्याची शक्यता आहे. त्यांचे पुनर्वसन झाले तर निश्चितपणे उत्तर महाराष्ट्र आणि जिल्ह्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही”, असे उदयसिंग पाडवी यांनी म्हटले आहे.