अजित पवार एका आठवड्यानंतर पुन्हा जनसेवेत

मुंबई नगरी टीम

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन ही माहिती दिली आहे.तसेच अजित पवार हे पुढील एक आठवडा घरीच राहून विश्रांती करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार हे दोन आठवड्यापूर्वी इंदापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर त्यांना थकवा तसेच ताप व सर्दी सारखे त्रास जाणवत होते. त्यामुळे काही दिवस ते घरीच क्वारंटाईन होते. सुरुवातीला त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. पंरतु दुसऱ्यांदा त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना २६ ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचार घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

अजित पवार यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी यावेळी सर्वांचे आभार मानले. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच राजकीय वर्तुळातील अनेकांनी त्यांना लवकर बरे व्हा, अशा सदिच्छा दिल्या होत्या. तसेच अजित पवार यांच्या समर्थकांनी देखील ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली होती. या सगळ्यांचे आभार मानत सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअॅप स्टेटस द्वारे भावनिक पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात होती.

Previous articleविद्यार्थी- पालकांची कृष्णकुंजवर धाव,राज ठाकरेंचा थेट शिक्षणमंत्र्यांना फोन
Next articleराज्यपाल भाजपला झुकते माप देतात म्हणणारे गरिमा राखत नाहीत – चंद्रकांत पाटील