भाजप कार्यकर्त्यांची नाराजी म्हणजे त्यांचे राजीनामे ;खडसेंचा भाजपला दे धक्का

मुंबई नगरी टीम

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून जिल्ह्यात पक्षाचे वर्चस्व स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आपण आता भाजपला ताकद दाखवून देऊ. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीच असेल, असा एल्गार खडसेंनी पुकारला आहे. तसेच जिल्ह्यातील भाजपमधील अनेक कार्यकर्ते नाराज असून ते राजीनामे देण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

रावेर तालुक्यातील भाजपच्या ६० पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी आज एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुक्ताईनगर मधील निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंनी भाजपला इशारा दिला आहे. भाजपचे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत. या नाराजीचा परिणाम म्हणजे त्यांचे राजीनामे, असे विधान एकनाथ खडसे यांनी केले आहे. तर हे नाराज कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यानंतर कोणीही भाजप सोडून जाणार नाहीत, असा विश्वास भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. जे हौशे-गवशे असतील तेच भाजप सोडून जातील, असा टोला त्यांनी लगावला. तसेच कुणीही राजीनामे देत नाही, कुणीही पक्ष सोडून जाणार नाहीत. कुणीही आमदार त्या ठिकाणी जाणार नाही. कोणताही नगरसेवक, जिल्हा परिषदेचा सदस्य जाणार नाही हे सूर्य प्रकाशा एवढे स्वच्छ असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले.

Previous articleराज्यपाल नियुक्त १२ आमदारांशी आमचा संबंध नाही
Next article“हम तब भी आपके साथ रहेंगे”, नाशिकमध्ये रंगली भुजबळ आणि राज्यपालांची जुगलबंदी