मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्याच्या विरोधीपक्षनेते पदी असताना मुंबई येथील सीएसटी रेल्वे स्थानकावर ज्या पेटीवर (हमालांचे बसण्याचे एक ठराविक ठिकाण) ९० च्या दशकात स्व.गोपीनाथराव मुंडे बसत असत, त्याच पेटीवर आज प्रवासासाठी निघालेल्या धनंजय मुंडे यांना स्थानकावरील हमाल मंडळीनी बसण्याचा आग्रह केला असता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे त्याच पेटीवर बसून येथील हमाल मंडळींशी मनमोकळ्या गप्पा केल्या.
धनंजय मुंडे यांनी सीएसटी स्थानकावरील जवळपास सर्वच हमाल मंडळींना व अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत, सर्वांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले; यावेळी सर्वच हमाल मंडळींनी मुंडे यांच्या मनाचा दिलदारपणा अनुभवत कृतज्ञता व्यक्त केली. झाले असे की, आज मंत्री धनंजय मुंडे हे लातूर-बीड जिल्हा दौऱ्यासाठी सीएसटी रेल्वे स्थानाकावरुन मुंबई – लातूर एक्सप्रेस रेल्वेने प्रवासासाठी निघाले होते. रेल्वेच्या निघायच्या काही मिनीटे आधी ते सीएसटी स्थानकावर आले असता, येथील हमाल मंडळींनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे विरोधीपक्षनेते पदी असताना वेटिंग रूम मधील ज्या पेटी वर बसायचे त्याच पेटीवर धनंजय यांनी पुन्हा बसण्याचा आग्रह केला.
धनंजय मुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या पेटीवर बसून सर्व हमाल मंडळींशी संवाद साधत त्यांना दिवाळी च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे वजनदार मंत्री आपल्या सोबत बसून मनसोक्त गप्पा मारत असल्याचे पाहून अनेकांना त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. यावेळी धनंजय मुंडे यांनीही सर्वच हमाल मंडळी व अन्य कर्मचाऱ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी जेवायला येण्याचे निमंत्रण दिल्याने सर्वच मंडळी अक्षरश: भारावून गेल्याचे चित्र सीएसटी रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले.