शरद पवार@८०; पंतप्रधान मोदींसह ‘या’ दिग्गज नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुत्सद्दी राजकारणी, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सर्वत्र मोठ्या उत्साहाने त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेत्यांनीही शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

“सर्वशक्तीमान देव शरद पवार यांना दीर्घायुष्य देवो”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना महाविकास आघाडीचे आधारस्तंभ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. “त्यांची ऊर्जा उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना”, असे ट्वीट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांनी अगदी रात्री १२ वाजताच ट्वीट करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. “हिमालया एवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला, आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्व, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो”, अशा सदिच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

“देशातील सर्वात उंच नेता आदरणीय शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण सर्वांसाठी प्रेरणा आहात. तरुणांना नेहमीच समाजसेवेसाठी मार्गदर्शन करत असता. आपल्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो”, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी म्हटले आहे की, “वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय शरद पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असे ट्वीट आमदार रोहित पवारांनी केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या अंदाजात पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. “साहेब, तुम्ही होता म्हणूनी…देशाचे नेते आदरणीय शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात विविध विचारसरणीच्या तीन पक्षांना एकत्रित आणण्याचा विडा शरद पवारांनी उचलला आणि ते साध्यही करून दाखवले. त्यामुळे शरद पवार होते म्हणून… असे म्हणत संजय राऊत यांनी एकप्रकारे महाविकास आघाडीची मोट बांधल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, “राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला उत्तम आयु व आरोग्य लाभो याच सदिच्छा!”,

Previous articleशाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवा, शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Next articleशरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर मला आवडेल, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा पाठिंबा