मुंबई नगरी टीम
मुंबई : बॉलिवूडमधील चंदेरी दुनियेपासून फारकत घेतल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राजकारणाकडे आपली पावले वळवली.सिनेमा असो,राजकारण असो किंवा अगदी कंगना राणावतसोबत झालेला वाद असो उर्मिला यांच्या भोवतीची चर्चा काही संपताना दिसत नाही. नुकताच शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी आपल्या नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. असे असतानाच उर्मिला यांनी मुंबईत एक आलिशान ऑफिस खरेदी केले असल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
या वृत्तानुसार, उर्मिला यांनी खार पश्चिम येथील लिंकिंग रोडला हे आलिशान ऑफिस खरेदी केले आहे. इथल्या दुर्गा चेंबर्स या सात मजली इमारतीमध्ये त्यांनी हे ऑफिस खरेदी केले आहे. जवळपास १०३९.९०१ चौरस फूट इतकी या ऑफिसची जागा असून याची किंमत तब्बल ३ कोटी ७५ लाख इतकी आहे. उर्मिला यांनी सहाव्या मजल्यावर ही जागा खरेदी केली आहे. एका व्यावसायिकाकडून त्यांनी हे ऑफिस खरेदी केले आहे. या इमारतीमधील कार्यालयीन जागांसाठी दरमहा ५ ते ८ लाख रुपये इतके भाडे आकारले जाते, अशीही माहिती समोर येत आहे. परंतु या सर्वावर आता उर्मिला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उर्मिला यांच्या नव्या आलिशान ऑफिसबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावर उर्मिला यांनी एक व्हिडीओ ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. मी ऑफिस खरेदी केले हे खरे आहे. मात्र जाणूनबुजून अर्धवट सत्य समोर आणण्यात आले आहे. काही माध्यमांनी ही चुकीची माहिती प्रसिद्ध देखील केली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अंधेरीतील डी. एन नगरमध्ये माझा एक फ्लॅट मी विकला होता. याच पैशातून हे ऑफिस खरेदी करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. शिवाय खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना त्यांनी खडबोलही सुनावले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर उर्मिला यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या बराच काळ चर्चेच्या गरड्यापासून काहीशा दूर होत्या. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर झालेल्या वादात त्यांनी मुंबई पोलिसांची बाजू ठामपणे घेतली होती. तसेच अभिनेत्री कंगना राणावतसोबत त्यांचा ट्विटर वॉरही रंगलेला पाहायला मिळाला. या सर्व घडामोडींमध्ये विधनापरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी शिवसेनेकडून उर्मिला यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच उर्मिला यांनी शिवसेनेते जाहीर प्रवेश केला.