मुंबई नगरी टीम
परळी : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ऐन ग्रामपंचायत निवडणूकीच्या तोंडावर गंभीर आरोप होवूनही तालुक्यातील जनतेने धनंजय मुंडे यांना खंबीर साथ देल्याचे चित्र आहे.परळी मतदारसंघात पुन्हा एकदा धनंजय मुंडेनी एकेरी वर्चस्व सिद्ध करणारे ग्रामपंचायत निकाल हाती आले आहेत.मतदारसंघातील परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण १२ ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती त्यांपैकी १० ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून उर्वरित २ ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत.
परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन तर अंबाजोगाई तालुक्यातील मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या ३ अशा एकूण ५ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध निवड करण्यात धनंजय मुंडे यांना यश आलेले आहे.त्यानंतर झालेल्या उर्वरित गावांमधील निवडणुकीत परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर या ४ गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भोपळा ही एकमात्र ग्रामपंचायत भाजपला राखण्यात यश आले आहे.अंबाजोगाई तालुक्यातील एकूण ५ पैकी मूर्ती, वाकडी व हनुमंतवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या असून अंबलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचेच दोनही पॅनल विजयी झाले आहेत. तर दत्तपुर ७ पैकी २ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.
दरम्यान १२ ग्रामपंचायत निवडणुकीत १० ग्रामपंचतींमध्ये एकहाती विजय मिळवत परळी मतदारसंघातील जनता धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे या निकालांवरून पुन्हा एकदा दिसून येत आहे.या सर्व विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत धनंजय मुंडे यांच्या जगमित्र या संपर्क कार्यलयात विजयी जल्लोष केला असून, सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे जि. प. गटनेते अजय मुंडे यांनी हार घालून व पेढे भरवून अभिनंदन केले आहे तसेच सर्व विजयी उमेदवारांचे धनंजय मुंडे, जि. प. अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट, आ. संजय दौंड, वाल्मिक अण्णा कराड यांनीही अभिनंदन केले आहे.