मुंबई नगरी टीम
मुंबई । कोरोनामुळे संकटात सापडलेल्या हॉटेल-परमिट रूम,बार व्यावसायिकांना विविध सवलती देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्यानंतर आता भाजपने या मुद्द्यावरून सरकारला आणि शरद पवार यांना घेरले आहे.एकीकडे मठ-मंदिरांची वीज तोडायची आणि दुसरीकडे बारचालकांना वीजबीलात सवलत द्यायची हे सहन करणार असा इशारा देतानाच शरद पवारांना शेतकरी,मजूर,लोककलावंतांची उपासमार का दिसली नाही असा सवाल भाजपने केला आहे.
भाजपचे अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून खरपूस समाचार घेतला आहे.या सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारचालकांवर प्रेम का हे कळाले,कारण या सरकारचे निर्माते असलेले शरद पवार बार धार्जिणे असल्याचा घणाघात तुषार भोसले यांनी केला आहे.हे पत्र लिहिताना पवार यांना राज्यातील शेतकरी,मजूर,मराठा आरक्षण,हाल-फुल विक्रेते,हातावर पोट असणारे लोककलावंत यांची उपासमार दिसली नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. एकीकडे मठ-मंदिरांची वीज तोडणी करायची आणि बारचालकांना वीजबील सवलत द्यायची हे चित्र आम्ही सहन करणार नाही असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.तुम्हाला हफ्ते मिळतात म्हणून बार चालकांसाठी वेगळे धोरण आखायचे आणि हातावर पोट असलेल्यांना कोणतीही सवलत द्यायची नाही,हे आम्हाला मान्य नाही असा घणाघातही भोसले यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून,परवानाधारक हॉटेल-परमिट रूम,बार मालकांना अबकारी कराचा भरणा भरण्यासाठी आणि वीज बिलामध्ये सवलत देण्याबरोबरच मालमत्ता करात सूट देण्याची मागणी त्यांनी केली होती त्यावरून भाजपने शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.