मुंबई नगरी टीम
मुंबई । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रमाणपत्र रद्द करीत नवनीत राणा यांना २ लाखांचा दंड ठोठावला आहे.राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.तर नवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं असा टोला राष्ट्रवादी महिला कॅाग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.या दाव्याचा निकाल आज देण्यात आला.हा घटनेवरील घोटाळा आहे,असे मत उच्च न्यायालयाने नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना २ लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच सदरचे खोटे जात प्रमाणपत्र ६ आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत.जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात असून,नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२०१३ मध्ये नवनीत कौर यांचा विवाह आमदार रवी राणा यांच्याशी झाला.त्यानंतर नवनीत कौर यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाण पत्राविरोधात माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती.
नवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं. pic.twitter.com/9sebS16kX4
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 8, 2021
या जात प्रमाणपत्राच्या आधारे नवनीत राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली.त्यामध्ये त्यांनी शिवसेनेचे उमेदवार अडसूळ यांचा पराभव केला होता.नवनीत राणा यांनी ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली, तेच प्रमाणपत्र रद्द झाल्याने राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.तर या वर प्रतिक्रिया देताना अडसुळ म्हणाले की,मुंबई उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले असल्याने राणा यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास दूध का दूध आणि पानी का पानी झाले आहे.त्यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. हा फार मोठा गुन्हा आहे. यामुळे राणा यांना तुरुंगात सुद्धा जावे लागू शकते.त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही अडसूळ यांनी स्पष्ट केले.