मुंबई नगरी टीम
मुंबई । दुकानांवर मराठी भाषेतील नावाच्या पाट्या असाव्यात मात्र त्यासाठी राष्ट्र भाषा हिंदी तसेच इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्यांना विरोध करणे योग्य नाही.तसेच मराठी पाट्यांचा आकार आणि इंग्रजी भाषेतील पाट्यांचा आकार यावरून भाषिक भेदभाव करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आमचा विरोध आहे.असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले.
याआधी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात याचा आग्रह धरला.आता मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने सर्वात आधी भूमीका घेत मराठी पाट्यांचा विषय आणला असुन त्यासाठी राज्य सरकारने तसा कायदा केला आहे.मात्र दुकानांवरील पाट्यांचा आकार लहान मोठा ठरविल्यामुळे मराठी भाषेला मोठेपणा मिळेल असा विषय नसून मराठी भाषा ही मुळातच मोठी आणि श्रेष्ठ आहे.आम्हाला ही आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे.मात्र मुंबईत येणारे परप्रांतीय नागरिक; परदेशी पर्यटक यांना मराठी सोबत इंग्रजी पाटी सोयीची ठरते.इंग्रजी पाटी नसेल तर मुंबईत व्यापारातून जी मोठी आर्थिक उलाढाल त्यावर याचा परिणाम होईल.त्यामुळे मराठी आणि इंग्रजी ,हिंदी सर्व भाषेतील पाट्या असाव्यात.त्यातील आकारावरून भेदभाव शासनाने करू नये.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.मुंबई सर्वांना सांभाळून घेते त्या प्रमाणे दुकानांवरील मराठी आणि अन्य भाषेच्या पाट्यांचा वाद थांबवून मराठी सोबत इंग्रजी भाषेचाही पाट्या लावाव्यात त्यातील कोणत्या भाषेचा आकार छोटा आणि मोठा असा भेद कोणी करू नये असे म्हणाले.
मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी मराठी माणसांच्या आर्थिक आणि सर्वांगीण प्रगती साठी राज्य शासनाने विधायक कामे करावीत,दुकानांवरील पाट्या मराठी असण्यासाठी आणि त्या पाट्यांवरील मराठी अक्षरे मोठी असण्यासाठी शिवसेना आणि राज्य शासनातील महाविकास आघाडी जो आटापिटा करीत आहे त्या पेक्षा मराठी माणसांची त्यांच्या मालकीची दुकाने मुंबईत कशी वाढतील,मराठी माणूस कसा व्यापार उद्योगात मोठा होईल याकडे अधिक लक्ष द्यावे असा टोला आठवले यांनी शिवसेनेला लगावला आहे.