मुंबई नगरी टीम
परळी वैजनाथ । गरीब आणि वंचितांचे नेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यासोबत नाहीत.पण आज शिवराजसिंहांसारखे लोक आमच्यासोबत जोडले जातात.तेव्हा आजही माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं.आज मला त्या दिवसाची आठवण येते.आज ८ वं पुण्यस्मरण आहे मुंडे साहेबांचं.मोदी सरकारलाही ८ वर्षे झाली आहेत. जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला असे सांगतानाच, हा गोपीनाथगड माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी आहे जे सकाळपासून तुमची वाट पाहत आहेत.मी मध्यप्रदेशची प्रभारी असेन नसेन पण तुमच्याशी जोडलेले आमचं नातं कायम राहील,अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गड येथे आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. या समारंभात विविध क्षेत्रातील वंचित, पिडित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “संघर्षदिन सन्मान” म्हणून सम्मान करण्यात आला. प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री मिलिंद कांबळे, गोरक्षक पद्मश्री सय्यद शब्बीर, सामाजिक कार्यकर्त्यां प्रिती पाटकर,कविता वाघ यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा, मार्ग निघतोच असा सल्ला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. तर सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे, उद्या काय मिळणार? याची चिंता मला नाही पण दिलेल्या संधीचं सोनं करणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या.गरीब आणि वंचितांचे नेते गोपीनाथ मुंडे आज आपल्यासोबत नाहीत. पण आज शिवराजसिंहांसारखे लोक आमच्यासोबत जोडले जातात. तेव्हा आजही म माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं. आज मला त्या दिवसाची आठवण येते. आज 8 वं पुण्यस्मरण आहे मुंडे साहेबांचं. मोदी सरकारलाही 8 वर्षे झाली आहेत. जिथे मुंडे साहेबांचा सत्कार करायचा होता तिथे अंत्यविधी करावा लागला. हा गोपीनाथ गड माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी आहे जे सकाळपासून तुमची वाट पाहत आहेत. मी मध्यप्रदेशची प्रभारी असेन नसेन पण तुमच्याशी जोडलेले आमचं नातं कायम राहील, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, मी आज गोपीनाथ गडावर भाजपाचा नेता किंवा मध्य प्रदेशचा
मुख्यमंत्री म्हणून नाही तर स्वर्गीय मुंडे यांचा भाऊ म्हणून उपस्थित आहे. भाजपाचे मजबूत संघटन आज देशभरात दिसून येते या संघटनाला महाराष्ट्राच्या गावागावांत पर्यंत पोहचवण्याचे कार्य स्वर्गीय प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या दोघांनी केले. मध्यप्रदेशमध्ये काम करताना सर्वप्रथम प्रमोद महाजन यांनीच आपल्याला अध्यक्ष म्हणून पक्षात संधी दिली आणि मुंडे-महाजन यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. अगदी जवळून मी या दोघांचेही काम पाहिलेले आहे. वंचित, उपेक्षित ,पिडीत घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी जीवनभर केले. गोपीनाथ मुंडे स्वतः गरीब परिवारातून आल्याने गरीबीच्या झळा अनुभवतच त्यांनी राजकारणात गरिबांसाठी काम करण्याची प्रेरणा घेतली. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळावा यासाठी अविरत संघर्ष केला. गोरगरिबांना न्यायासाठी ते जेवढे प्रेमळ होते तेवढेच गुंडशाही झुंडशाहीच्या विरुद्ध वज्राप्रमाणे कठोर होते ते त्यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना दाखवून दिले आहे. संघर्ष, साहस व सेवा हा त्रिवेणी संगम या लोकनेत्यामध्ये नक्कीच बघायला मिळतो. त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊनच जनकल्याणाचे कार्य अविरत त्यांच्या मुली करत असल्याचे कौतुकास्पद आहे. आपण सारे मिळून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जनसेवेचा हा वारसा निश्चित पुढे चालवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ओबीसी आरक्षणाच्या विषयावर बोलताना शिवराजसिंह चौहान म्हणाले, मध्य प्रदेशात ओबीसींना आरक्षण द्यायचेच असा आपला ठाम निर्धार होता.न्यायालयांमध्ये यासाठी दिवस रात्र मेहनत घेऊन बाजू मांडली. आयोग, प्रशासन व स्वतः दिवस-रात्र एक करून ओबीसींना आरक्षण मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसलो नाही. मनातून काही द्यायचे असेल तर ती तडफ आणि त्या दिशेने प्रयत्न केले तर निश्चित मार्ग निघतो. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचा नक्कीच विचार करावा असा चिमटाही त्यांनी भाषणात बोलताना काढला. पंकजा मुंडे या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांना जपा, त्यांच्यामागे पाठबळ उभे करा, निश्चितच पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रमाणेच जनसेवेचा वारसा पुढे चालू राहील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.