मुंबई नगरी टीम
मुंबई । शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या गुरूवारी विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते.राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मात्र महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली असल्याने ठाकरे सरकारला मोठ्ठा धक्का बसला आहे.या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला.त्यानंतर त्यांनी राजभवनात जावून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची येथे भेट घेवून राजीनामा सुपूर्द केला.
शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर झाल्याने विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेवून सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले होते.त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्या गुरूवारी विशेष अधिवेशन घेवून बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले.राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.मात्र न्यायालयाने सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी फेटाळल्याने ठाकरे सरकारला धक्का बसला आहे.या पार्श्वभूमीवर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे.