मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील सत्ता नाट्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करीत असतानाच बंडखोरी केलेल्या आमदारांवर हल्लाबोलही केला.रिक्षावाले,हातभट्टीवाले टपरीवाले यांना नगरसेवक,महापौर, आमदार, खासदार, मंत्री केले ज्यांना मोठे केले, ज्यांना सत्ता दिली, ती लोकं नाराज झाली आहेत असा शब्दात त्यांनी बंडखोरांचा समाचार घेतला.
शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्याला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने ठाकरे सरकारची मागणी फेटाळून लावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.यावेळी त्यांनी बंडखोर आमदार आणि राज्यपालांचा समाचार घेतला.रिक्षावाले, हातभट्टीवाले.टपरीवाले यांना आपण नगरसेवक,महापौर,आमदार,खासदार,मंत्री केले.ज्यांना मोठे केले,ज्यांना सत्ता दिली ती लोकं नाराज झाली आहेत.ज्यांना दिले ते नाराज, ज्यांना काही दिले नाही ते हिमतीने समोर आली.याला माणुसकी म्हणतात.आत्ता न्यायदेवतेचा निर्णय आला, उद्या राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याच आदेश आला आहे.राज्यपालांनी लोकशाहीचा मान राखत पत्र मिळताच २४ तासात पत्र दिले आहे. विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी लटकून पडली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.सरकार म्हणून छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन कामाला सुरुवात केली.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला.औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर व्हावे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते ते पूर्ण केले असेही ठाकरे यावेळी म्हणाले.सर्व चांगले सुरु असताना काही जणांची नजर लागली. यावेळी ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे सोनिया गांधी यांचे आभार मानले