मुंबई नगरी टीम
मुंबई । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.राज्यात राजकीय भूकंप होवून सत्तांतर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या गटाला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई उपनगरातील शिवसेनेचा एक मातब्बर आमदार शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याचे समजते.या आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून चर्चा केल्याचेही सांगण्यात येते.
विधान परिषद निवडणुकीचे मतदान संपताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करीत राज्यात सत्तांतर घडवून आणले.शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेना कमजोर झाली.मुंबई हा शिवसेनेचा आत्मा समजला जातो.याच मुंबईतून एकूण १६ आमदारांपैकी ५ आमदारांनी शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेला मोठा फटका बसला आहे.मुंबईतील प्रकाश सुर्वे ( मागाठाणे ),सदा सरवणकर ( माहिम), दिलीप लांडे (चांदिवली),यामिनी जाधव (भायखळा),आणि कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक आपल्याकडे खेचण्याचे शिंदे गटाचे प्रयत्न सफल झाले नाही.मात्र आगामी काही दिवसात काही नगरसेवक आणि बडे नेते आपल्या गटात आणण्याची रणनिती शिंदे गटाने आखल्याचे सांगण्यात येते.
आगामी मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने कंबर कसली आहे.या निवडणुकीपुर्वी शिवसेनेतील काही बडे नेते आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे.मुंबईतील रमेश कोरगावकर ( भांडूप),अजय चौधरी ( शिवडी), आदित्य ठाकरे ( वरळी ), संजय पोतनीस ( कलिना) सुनिल प्रभू ( दिंडोशी ), प्रकाश फातर्पेकर ( चेंबूर ),सुनिल राऊत ( विक्रोळी) आणि रविंद्र वायकर ( जोगेश्वरी ) हे आमदार उद्धव ठाकरे गटाकडे आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील ह्या आमदारांपैकी काही आमदार आपल्या गटात खेचून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दुसरा धक्का देण्याच्या तयारीत शिंदे गट असून,मुंबई उपनगरातील एक मातब्बर आमदार शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.या आमदाराने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून चर्चा केली असल्याचेही समजते.या आमदारासोबत शिवसेनेचे एक ज्येष्ठ खासदारही या बैठकीला उपस्थित होते असेही समजते.अंधेरी पुर्व विधानसभेची पोटनिवडणूक पार पडताच मुंबई उपनगरातील उद्धव ठाकरे यांच्या गटातील एक आमदार शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.असे झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या गटाला हादरा बसू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.