४ महिन्यात ११३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या,सरकारकडून केवळ घोषणाबाजी

मुंबई नगरी टीम

कन्नड । मुख्यमंत्री आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याच्या नुसत्या घोषणा करत आहे. परंतु महाराष्ट्रात मागील ४ महिन्यात जवळपास ११३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. युवकांना मिळणारा रोजगार देखील गुजरातच्या घशात घातला आहे.या सरकारला जनतेची पर्वा नसल्याचे म्हणत कृषिप्रधान असलेल्या आपल्या राज्यात सरकारकडून घोषणाबाजी होत असून वास्तविक काम मात्र शून्य आहे, अशी परखड टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल आज कन्नड तालुक्यातील दहिगाव, नचानवेल, सेलगांव, वाकद आदी ठिकाणी अंबादास दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच आमदार उदयसिंग राजपूत यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आलेल्या कन्नड, सोयगाव मतदार संघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले, त्यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना दानवे बोलत होते.शेतकऱ्यांना हक्काचा पिकविम्याचा मोबदला मिळत नाही. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने उभे पीक वाहून गेले. शेतीच्या झालेल्या नुकसानामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला असून आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. सरकारकडून कोणतीच मदत होत नसून सरकारच्या धोरणांवर जनता नाराज असल्याचे दानवे म्हणाले.जसा मूठभर मावळ्यांनी इतिहास रचला होता. त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक इतिहास रचतील. शेतकरी, नागरिकांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असतील अशी ग्वाही दानवे यांनी यावेळी दिली.

Previous articleराज्य सरकारचा मोठा निर्णय : घरेलू कामगारांना मिळणार दहा हजार रुपये
Next articleखोके सरकारचे लक्ष उद्योग, कृषी क्षेत्रावर नाही; आदित्य ठाकरेंची सरकारवर सडकून टीका