मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज,वैद्यकीय शिक्षण,क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती.मात्र पोलिस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरिल वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता या कारणास्तव त्यांनी ही सुरक्षा व्यवस्था नाकारली आहे.
गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांना ९ नोव्हेंबर २०२२ पासून वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.मंत्री महाजन यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र पाठवून अतिरिक्त वाय प्लस काढून घेण्याची विनंती केली आहे.या पत्रातमहाजन यांनी म्हटले आहे की सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा नेहमी तत्पर असते.मात्र सध्या राज्यातील पोलिस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरिल वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता या सर्व बाबींचा विचार करता मला पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी.या साठी संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत असे मंत्री महाजन यांनी पोलिस महासंचालक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.सध्य परिस्थिती ग्रामविकास मंत्री महाजन यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारण्याच्या घेतलेल्या निर्णयांचे समाजातील सर्व घटकांतील लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.