मुंबई नगरी टीम
नागपूर । भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा छेडछाड केलेला फोटो समाज माध्यमावर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
सरस्वती देवीला न मानणारा एकदम ओरिजनल सांता क्लॉज… pic.twitter.com/pUMSkKVfa5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2022
विधानसभेतील सदस्यच दुसऱ्या ज्येष्ठ सदस्यांच्या फोटोशी छेडछाड करून समाज माध्यमावर प्रसारित करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी सभागृहात केला.छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील संबंधित छायाचित्र दाखवत हे अतिशय गंभीर आहे असेही पाटील म्हणाले.दरम्यान राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी समाज माध्यमाची संहिता पाळावी असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि भाई जगताप यांचा विधानभवनात चर्चा करतानाचे एक छायाचित्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर समाज माध्यमात शेअर केले असून, भातखळकर यांनी भुजबळ यांच्या फोटोशी छेडछाड करीत त्यांनी सांताक्लॅाजची टोपी परिधान केलेले आपल्या फोटोत दाखवले आहे.त्यावर त्यांनी सरस्वती देवीला न मानणारा एकदम ओरिजनल सांताक्लॅाज अशी शेरेबाजी केली आहे. मात्र ख-या फोटोत छगन भुजबळ आणि भाई जगताप आणि हसन मुश्रीफ हे चर्चा करतानाचा हा फोटो आहे.