मुंबई नगरी टीम
मुंबई । अजित पवार यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या बुधवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाचे आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष,कार्यकारिणी सदस्य,तालुकाध्यक्षांची तातडीची बैठक बोलावली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उद्या वांद्रे यथिल एमआयटी संस्थेत समर्थक आमदार,खासदार आणि पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे.या निमित्ताने दोन्ही गट मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.या निमित्ताने कोणत्या गटाकडे किती आमदार खासदार आहेत हे स्पष्ट होणार असल्याने उद्या होणा-या दोन्ही बैठकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करीत राज्य सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.आपल्याला ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गट करीत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मैदानात उडी घेत सारी सुत्रे आपल्या हातात घेतली आहेत.आज राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे आणि राजेंद्र शिंगणे यांनी सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवास्थानातून आमदारांशी संपर्क मोहिम राबविली.उद्या बुधवारी दुपारी १ वाजता शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची विशेष बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेश पदाधिकारी,फ्रंटल सेल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुकास्तरावरील सर्व फ्रंटल सेलच्या सदस्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.या बैठकीला विधानसभा,विधानपरिषद,लोकसभा, राज्यसभा सदस्यांना उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार,खासदार आणि पदाधिका-यांची बैठक बोलावली असतानाच दुसरीकडे अजित पवार यांनीही उद्या बुधवारी वांद्रे यथिल एमआयटी संस्थेत समर्थक आमदार,खासदार आणि पदाधिका-यांची बैठक बोलावली आहे.बंडाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करीत आपल्याकडेच मोठ्या प्रमाणात आमदार,खासदार,पदाधिकारी आहेत यासाठी कंबर कसली आहे.या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही गट मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करीत आपल्याच गटाकडे मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याचा दावा करण्याची शक्यता असल्याने या दोन्ही बैठकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.अजित पवार यांनी आपल्याला ४१ आमदारांचे समर्थन असल्याचे सांगितले असल्याने शरद पवार आणि अजित पवार गटाकडे नेमके किती आमदार खासदार आहेत हे उद्या बुधवारी स्पष्ट होईल.
आमची ‘राष्ट्रवादी’ तर त्यांची ‘नोशनल पार्टी’
आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.परवा घडलेल्या घटनेमुळे शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत.अजित पवार यांच्यामुळे शिवसेना सोडली तीच कारणे परत आमच्या पुढयात आणून ठेवत आहात याबद्दल प्रचंड असंतोष एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांमध्ये आहे.ज्यांच्या जिल्हयात विरोध केला तेच मंत्री झाले आहेत. त्यामुळे असंतोष हळूहळू पुढे येईल असेही जयंत पाटील यांनी सांगितले.नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्हयात शरद पवार हे दौरा करणार आहेत.त्यांची सुरूवात नाशिक जिल्ह्यातून होईल त्याअगोदर दिल्लीत कार्यकारिणीची बैठक होईल. राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. त्यापैकी बंड केलेल्या ९ आमदारांवर कारवाई केली आहे, असेही पाटील म्हणाले.