शिवस्मारकाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही : मुंडे

मुंबई नगरी टीम

नाशिक : शिवस्मारक हा राज्यातील ११ कोटी जनतेच्या  जिव्हाळ्याचा प्रश्न असतांनाही सरकार त्याबाबत गंभीर नाही म्हणूनच त्याचे काम थांबवण्याची नामुष्की सरकारवर आली असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्याची सुरुवात आज नाशिक येथून होत आहे. त्याआधी नाशिक येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आ. जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते.

शिवस्मारकाचे काम थांबवण्यात आल्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांना मुंडे म्हणाले की, हा विषय न्यायालयीन वादात अडकू नये याची काळजी घ्या हे मुख्यमंत्र्यांना याआधीच सांगितले होते.  याच्या निविदा प्रक्रियेतही घोटाळा झाल्याची तक्रार खुद्द समितीच्या अध्यक्षांनी ( विनायक मेटे )  केली होती. केवळ चार चार  वेळा भूमिपूजन करून दिशाभूल करण्यापेक्षा सरकारने जनतेच्या भावनेचा हा विषय गांभीर्याने  हाताळला पाहिजे. आज बेस्ट संपाचा ९ वा दिवस आहे. तरी तोडगा काढता येत नाही, कर्मचाऱ्यांनी वारंवार निवेदन दिली होती तरी सरकारने दखल घेतली नाही, मनपा शिवसेनेकडे आहे, बेस्ट शिवसेनेकडे आहे, परिवाहन खातं शिवसनेकडे आहे तरी तोडगा काढता येत नाही,  मेस्मा लावणे अन्याय कारक आहे, सर्व कर्मचारी संपावर जात आहे, जे लोक गावगाडा सांभाळतात ते लोक संपावर जात आहे त्यामुळे हे सरकार अपयशी असल्याची टीका मुंडे यांनी केली.

महागाई ,नोटाबंदी, जीएसटीमुळे सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. समाजातील सर्व घटक उद्ध्वस्त झाला आहे.  परिर्वतन यात्रेच्या दरम्यान लोकांच्या मनात एक असंतोष राग निर्माण झाले असल्याचे दिसत आहे. हा राग, असंतोष जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा त्याचे मतांमध्ये परिवर्तन होते. याचा फायदा आघाडी ला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नाणारबाबत या सरकारमध्ये पूर्वी पासून संभ्रम आहे. नाणारची जागा बदलली जाणार असल्याच्या बातम्या आता प्रसारित होत आहे.  राज्य सरकार मध्ये पोरखेळ सुरू आहे. सरकारचा नियोजन शुन्य कारभार सुरू असल्याचे ते म्हणाले.शासकीय दिनदर्शिकेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचा उल्लेख आहे मात्र तुकोबा़चा जयंतीचा उल्लेख नाही, संत नामदेव यांच्या जयंतीचा का उल्लेख नाही  असा सवाल उपस्थित करून सरकार महापुरुषांचा अवमान करत असल्याचे ते म्हणाले

Previous articleदोन वर्षात ३२०० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारणार : ऊर्जामंत्री
Next articleनिवडणुकीच्या तोंडावर सरकारला ओबीसींचा कळवळा : भुजबळ