लोकायुक्त कायदा करुन जनतेची दिशाभूल : मलिक

मुंबई नगरी टीम

मुंबई : सत्तेत येवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार वर्षात लोकायुक्त कायद्यामध्ये बदल केला नाही तर  काल लागू केलेला कायदा म्हणजे जनतेची दिशाभूल करणारा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

समासेवक अण्णा हजारे यांनी  लोकपाल बिलासाठी काही वर्षापुर्वी आंदोलन केले होते त्यावेळेला अण्णा हजारे यांच्या सोबत  असणारे नेते आता भाजपाचे नेते झाले आहेत असेही मलिक म्हणाले. लोकायुक्त कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी त्यावेळी भाजपा नेते मागणी करत होते. स्वतः मुख्यमंत्री हे आमदार असताना हा कायदा लागू करावा असे मागणी करत होते त्यावेळेला ते स्वतः  आंदोलन करीत सभागृह बंद पडण्याचे काम करत होते. लोकायुक्त मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची सुद्धा चौकशी करेल पण मुख्यमंत्री पदावर असताना त्यांची चौकशी होणार नाही तर दुसरा मुख्यमंत्री येईल त्यावेळेस राज्यपालांच्या मंजुरीने माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी होईल असे मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले. आता लागू केलेल्या कायद्यामध्ये चौकशी केल्यावर त्याचा अहवाल हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल त्याला स्वीकारायचे की नाही याचे अधिकार देखील मंत्रीमंडळाला आहे आणि तो अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवावा एवढेच या कायद्यात आहे असेही मलिक म्हणाले.

 हा अहवाल स्वीकारायचा की नाही याचा पूर्ण अधिकार सरकारला आहे. मुख्यमंत्री स्वतः विरोधी बाकावर असताना चौकशीसोबत, पोलिसांचे अधिकार लोकायुक्तांना द्यावे अशी मागणी करत होते. अटक करण्याचे अधिकार द्यावे,छापा टाकण्याचे अधिकार द्यावे, आरोपपत्र दाखल करण्याचे अधिकार दिले जावे अशी मागणी करत होते. परंतु काल लोकायुक्त कायद्यात बदल केला गेला त्यामध्ये तशी तरतुद करण्यात आली नसल्याचा टोला  मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

दरम्यान दोन्ही कॅांग्रेसची आघाडी झाली असून, जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ४४ जागांचा निर्णय झाला आहे तर ४ जागांवर चर्चा सुरू आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत चर्चा असून, त्यांनासुद्धा सोबत घेवु. त्याच्या शिवाय अनेक गटांचा आम्हाला पाठींबा आहे असे सांगतानाच राज ठाकरे यांना आघाडीत घेण्याबाबत कोणतीही चर्चा सध्यातरी चालु नाही असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Previous articleतो अहवाल पाहून छप्पन इंची छातीत धस्स तर झालं नाही ना? – धनंजय मुंडे
Next articleशेतकरी-कष्टकरी, महिला आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा : मुख्यमंत्री