मुंबई नगरी टीम
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेची सांगता झाली असली तरी सरकारविरोधातील संघर्ष काँग्रेस पक्षाने थांबवला नाही. किंबहुना तो अधिक तीव्र केला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात ५० जाहीर सभा घेण्यात येणार असून उद्या गुरुवार दि. ७ फेब्रुवारी रोजी दौलताबाद जि. औरंगाबाद येथे पहिली जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
या संदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, केंद्रीतील व राज्यातील नाकर्त्या व लोकविरोधी भाजप शिवसेना सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेला राज्यभरात जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या यात्रेच्या माध्यमातून साडे सहा हजार किलोमीटरचा प्रवास करून १२० विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेऊन जनतेशी संवाद साधला होता. सरकारविरोधातील संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी राज्यभरातील विविध शहरांमध्ये ५० जनसंघर्ष सभा घेण्यात येणार आहेत. या सभांचा माध्यमातून निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचून केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा व अपयशाचा पंचनामा केला जाणार आहे. राज्यातील सर्व प्रमुख नेते व काँग्रेस पक्षाचे केंद्रीय पातळीवरील नेते या जाहीर सभांना मार्गदर्शन करणार आहेत. पहिली जनसंघर्ष सभा उद्या दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता दौलताबाद जि. औरंगाबाद येथे होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता औरंगाबाद शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. तर शुक्रवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पैठण जि. औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे व सायंकाळी ५.३० वाजता पुणे शहरात जनसंघर्ष सभा आयोजित करण्यात आली आहे.