राहुल गांधी मिटवणार मुंबई कॉंग्रेसमधील वाद !

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई कॉंग्रेसमध्ये उफाळलेल्या अंतर्गत वादावर आता पक्षाध्यक्ष राहुल गांधी स्वत: लक्ष घालणार आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा वाद कॉंग्रेसला भोवू शकतो,हे लक्षात आल्याने राहुल गांधींनी या नेत्यांची बैठक घेऊन त्यांना समज दिली जाणार आहे,असे समजते.

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आणि इतर नेत्यांमध्ये वाद उफाळले आहेत. याच वादामुळे प्रिया दत्त यांनी निवडणुकीतून माघार घेतली.तर आता मिलिंद देवरा यांनीही अंतर्गत वादामुळे आपणही निवडणूक लढवू इच्छीत नाही,असे ट्विट केले होते.देवरांचा रोखही निरूपम यांच्याच दिशेने होता.

पक्षाला नेत्यांमधील भांडणाचे मैदान बनवायचे का,असा सवाल देवरांनी केला होता.निरूपम हे कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतात,असा आरोप केला जातो.माजी खासदार एकनाथ गायकवाड,कृपाशंकर सिंह,नसीम खान आणि जनार्दन चांदूरकर निरूपम यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत.त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे तक्रारीही केल्या.आता राहुल गांधी यांनी त्यांच्या तक्रारींकडे लक्ष देण्याचे ठरवले असून लवकरच सर्वांची बैठक घेणार आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कॉंग्रेसमधील वाद उफाळल्याने कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.निरूपम यांच्यावर एककल्ली कारभाराचा आरोप होत आहेत तर कॉंग्रेसच्या कुठल्याही आंदेलनात हे नेते कधीही भाग घेत नाहीत,असा निरूपम गटाचा दावा आहे.

Previous articleनितिशकुमारांच्या पंतप्रधानपदासाठी प्रशांत किशोर मातोश्रीवर?
Next articleराज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार