मुंबई नगरी टीम
अहमदनगर : राजकारणात कोण कसे बदलेल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विधानसभेतील विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वैमनस्य जगजाहीर असताना पवारांचे नातू रोहित पवार आणि विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांचीभेट झाली. या भेटीने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून नगर लोकसभा जागेचा तिढा सुटला असावा, या अंदाजाने कार्यकर्त्यांत उत्साह पसरला आहे.
नगर दक्षिणची जागा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी वादाची ठरली आहे. राष्ट्रवादीने या जागेवरील आपला हक्क कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही,असे जाहीर केले आहे. सुजय विखे यांना येथून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी अपक्ष म्हणूनही लढण्याची त्यांची तयारी आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी रोहित पवार यांनी त्यांची भेट घेतली का, अशीही चर्चा रंगली आहे. ही जागा नेमकी कुणाला सोडली जाणार आणि कोण येथून लढणार याची प्रचंड उत्सुकता जिल्ह्यात लागून आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार आणि सुजय विखे यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे.
रोहित पवार यांचे नाव सध्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात चर्चेत आहे. रोहित यांना सुजय विखे पाटील यांनी मदत करावी आणि त्या बदल्यात राष्ट्रवादीने सुजय विखे यांना नगरमध्ये मदत करावी, असा तोडगा निघाला काय, यावर तर्क केले जात आहेत. रोहित पवार कर्जत जामखेडमधून उभे राहिले तर पालकमंत्री राम शिंदे यांना मोठे आव्हान उभे राहू शकते. पवारांनी याबाबत कसलेही स्पष्टीकरण दिले नसले तरीही रोहित पवार यांचा वाढलेला जनसंपर्क, कार्यक्रमाना ते लावत असलेली हजेरी यावरून मतदारसंघात तसा अंदाज बांधण्यात येत आहे. शिवाय मतदारसंघात त्यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात लावले आहेत. खुद्द रोहित पवार यांनी पक्षाचा आदेश असेल तर तो मान्य करावा लागतो, असे सांगून आपण उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत.
दुसरीकडे सुजय विखे यांनी कॉंग्रेससाठी ही जागा सोडली न गेल्यास अपक्ष म्हणून लढण्याची कसून तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. रोहित पवार यांना सुजय विखे यांची समजूत काढण्यासाठी पाठवले का, असाही एक तर्क केला जात आहे. परंतु या निमित्ताने पवार आणि विखे पाटील याच्यातील तिसरी पिढी एकत्र येत आहे का, अशी चर्चा जोरात आहे.