मुख्यमंत्री उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेणार
मुंबई नगरी टीम
मुंबई : शिवसेना भाजप मध्ये युती घोषणा झाल्यानंतर राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघावरून मोठ्या प्रमाणात या दोन पक्षामध्ये असणारा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत बसू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून चर्चा करणार आहेत.
स्वबळाचा नारा देणा-या शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी भाजपाद्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जावून युती घडवून आणली.त्यानुसार भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा वाटप जाहीर करण्यात आले. स्वबळावर निवडणुकांची तयारी केल्यानंतर युतीची घोषणा होताच शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये मोटा संभ्रम निर्माण झाला आहे.तर काही जागांवरून शिवसेना भाजपामध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे. जालन्याच्या जागेवरून रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्री बंगल्यावर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटी लोकसभेच्या जागांचा आढावा घेवून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
जालन्यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे खासदार आहेत तर या जागेवर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दावा केला. भिवंडी ही भाजपची जागा असून कपिल पाटील हे खासदार आहेत. भिवंडीची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. शिवसेनेवर टीकास्त्र सोडणारे भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात असहकार पुकारला आहे. सोमय्या यांना भाजपने उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तर केंद्रिय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. शिवसेनेकडे असणा-या दक्षिण मुंबई मतदारसंघाची मागणी भाजपाने केली आहे.