राज ठाकरे उद्या काय बोलणार याची उत्सुकता शिगेला
मुंबई नगरी टीम
मुंबईः मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या पक्षाच्या वर्धापनदिन सभेत काय बोलणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याबाबत संभ्रमात असल्याची चर्चा आहे. मात्र ते निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करतील,अशी शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना बाहेरून पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.
मनसे मतदारांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांचा जोश टिकवण्यासाठी राज ठाकरे निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करू शकतात.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज ठाकरे यांनी सातत्याने मोदी सरकारवर टीका केली आहे.नोटबंदी आणि जीएसटीपासून पाकिस्तानवर हवाई हल्ल्यांवर त्यांनी मोदी सरकारला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे.मोदी शहा जोडीच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले होते. राज ठाकरे महाआघाडीत जाण्यासाठी निघाले होते. पण काँग्रेसने त्यांचे मनसुब्यांवर पाणी फेरले. आता एकटे पडल्यावर ते स्वबळावर लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला मात्र त्यांना महाआघाडीत घेण्याची तीव्र इच्छा होती.पण काँग्रेसने त्यांचा वारू रोखला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी राज ठाकरे यांना दीर्घकाळ ताटकळत ठेवल्यावर नकारघंटा वाजवली त्यामुळे मनसे कार्यकर्ते संभ्रमात असून त्यांचे मनोधैर्य टिकवण्यासाठी राज ठाकरे यांना काहीतरी सनसनाटी घोषणा करण्याची आवश्यकता आहे.मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये मनसेची ताकद आहे. तसेच राज्यव्यापी दौऱ्यावर त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला होता. त्यामुळे कदाचित राज ठाकरे यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा इरादा केला असावा,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.राज ठाकरे गेल्या वेळी जसे निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात होते तसेच आताही आहेत,असे बोलले जाते. मात्र गेल्या वेळी त्यानी मोदींना पाठिंबा दिला होता. उद्या मात्र राज ठाकरे मोदींवर नेहमीप्रमाणे धारदार टीका करण्याची शक्यता आहे.