लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात ९६ हजार व्हीव्हीपॅट यंत्र वापरणार

लोकसभा निवडणूकीसाठी राज्यात ९६ हजार व्हीव्हीपॅट यंत्र वापरणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार असून महाराष्ट्रातील ४८ मतदार संघासाठी ९६ हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्यातील ९६ हजार मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या ६ लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यांना तीन स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल.

व्हीव्हीपॅट यंत्रणा ‘ईव्हीएम मशिनसाठी पुरक असून मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे.मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले त्या संदर्भात माहिती व्हीव्हीपॅट मशिनवरील बटन दाबल्यानंतर मिळू शकेल. मतदान केंद्रांमध्ये हे व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर ७ सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळणार असून त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य होईल.या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र प्रथमच या लोकसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडून व्हीव्हीपॅट मशिनच्या वापराबद्दल सूचना निवडणूक यंत्रणेला देण्यात आले आहेत. या संदर्भात विभागस्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर जाणाऱ्या सुमारे ६ लाख कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासाठी सुमारे १ लाख ३५ हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात येतील. त्यापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे ९६ हजार यंत्रांचा वापर या निवडणुकीत केला जाणार आहे. तर अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्र झोनल अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येईल, असे राज्य मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाने सांगितले.

Previous articleमहाराष्ट्रात मुले पळवणारी टोळी सक्रीय :  जितेंद्र आव्हाड
Next articleविरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही