…… तर ईशान्य मुंबईची जागा आरपीआयला द्या
मुंबई नगरी टीम
मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप यांचे एकमत होत नाही. या मतदारसंघात सेना भाजप मध्ये टोकाचे वाद आहेत. हा वाद मिटविण्यासाठी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासाठी सोडावा अशी आग्रही मागणी आज रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपने मन मोठे करून रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्यास संपूर्ण देशभरात चांगला संदेश जाईल. ईशान्य मुंबईत शिवसेनेचा किरीट सोमैय्या यांना तीव्र विरोध आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही.त्यामुळे या मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे. ईशान्य मुंबईत शिवसेना भाजप चा सुरू असलेला टोकाचा वाद मिटवायचा असेल तर ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावी अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सुटल्यास या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले हे निवडणूक लढतील त्याबाबत त्यांची तयारी असल्याचे आरपीआयच्या नेत्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आठवले यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत चर्चा केली असून ,भाजप शिवसेना आरपीआय महायुतीच्या प्रचाराला रिपब्लिकन पक्षाने सुरुवात केली आहे. तरी देखील ईशान्य मुंबई हा मतदारसंघ आंबेडकरी जनतेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजप शिवसेनेत टोकाचे वाद होत आहेत. हे वाद मिटविण्यासाठी शिवसेना भाजप युतीने मन मोठे करून हा मतदारसंघ आरपीआय ला सोडावा असेही नेत्यांनी म्हटले आहे.