शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारला आस्था नाही

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारला आस्था नाही

मुंबई नगरी टीम

नाशिक : देशातील शेतकरी संकटात सापडले  असून दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मात्र आस्था नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज पिंप्री सैय्यद येथे आयोजित सभेते बोलत होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव डी. पी. त्रिपाठी, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विनायकदादा पाटील, शोभा बच्छाव,  माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आ. डॉ.अपूर्व हिरे, जयवंतराव जाधव,  दिलीप बनकर, श्रीराम शेटे, माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ.तुषार शेवाळे, राहुल ढिकले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, अॅड. रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, डॉ.सुनील ढिकले, अॅड. भगीरथ शिंदे, शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे, अर्जुन टिळे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे,  नाशिक पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंभळे, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, यशवंत ढिकले, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भामरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, पुरुषोत्तम कडलग, सचिन पिंगळे, दिपक वाघ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे मित्रपक्षांच्या आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात कांद्यासह शेतमाला भाव मिळत होता. मात्र आता परिस्थितीत उलटी झाली आहे. शेतमालाच्या निर्णयाची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी या मागची अर्थनीती नाशिक जिल्ह्याकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप सरकार ८० टक्के शेतीमाल खाणाऱ्याचा विचार करतात मात्र २० टक्के शेती पिकविनाऱ्या शेतकऱ्यांचा नाही. माजी पंतप्रधान मनमोहन सरकारच्या काळात गरिबांना अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून २ ते ३ रुपये किलोने अन्नधान्य उपलब्ध करून दिले. आघाडी सरकारने खाणारे आणि पिकविणारे या सर्वांचा विचार केला. मोदी सरकारने पाच वर्षात शेतमालाचे भाव दाम दुप्पट करू असे आश्वासन दिले. मात्र ते फोल ठरले. मोदी सरकार बोलते खूप काम मात्र करत नाही, म्हणूनच देशात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, देशात पुलवामा हल्ला झाला तेव्हा सर्व पक्षानी पाठिंबा दिला. त्यानंतर लष्कराने कारवाई करून सर्जिकल स्ट्राईक केले ही सर्व कारवाई लष्कराने केली छाती मात्र  फुगवतात मोदी अशी टीका करून मोदींचे कर्तव्य काय असा सवाल त्यांनी उपस्थीत केला. या कारवाई दरम्यान भारतीय हवाई दलातील पायलट अभिनंदन यांच्या सुटकेसाठी जगभरातील देशांनी टाकलेल्या दबावामुळे अभिनंदनला सोडवून आणण्यात यश आले. मात्र मोदी स्वतःची छाती फुगवून घेत आहे. तसेच मोदी गेल्या अडीच वर्षात कुलभूषणला का नाही सोडवू शकले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जवान शहीद होतात त्याचा राजकिय फायदा मोदी सरकारकडून घेतला जात आहे असा शहीद जवान कुटूंबियानी  आपल्या भावना आमच्याकडे व्यक्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मोदी माझ्यावर टीका करतात की पुतण्या पक्ष ताब्यात घेतो आहे. मात्र पक्ष एकट्याचा नसतो, कार्यकर्त्यांचा असतो असे सांगून मोदींचे घर नाही कुटुंब नाही त्यामुळे त्यांना कुटुंब व्यवस्था कळत नाही असा टोला लगावत देशाची निवडणूक असतांना मोदींना माझ्या कुटुंबाची काळजी असल्याचे टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी त्याग केला आणि मोदी म्हणतात त्यानी काही केले नाही. मोदींनी पाच वर्षात काहीच केले नाही म्हणून कुटुंबावर वैयक्तिक टीका करण्यात ते धन्यता मनात आहे. गेल्या पाचवर्षात नाशिकचा विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे नाशिकला प्रगतीपथावर नेण्यासाठी समीर भुजबळ यांच्यासारखे उमेदवाराची निवड करण्यात आला असून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडणूक आणावे असे आवाहन त्यांनी केले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी झालेली कामे, शेतकरी कर्जमाफी झाली त्यावेळी दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले त्यांना कुठला फॉर्म भरायला लावला नाही अशी टीका त्यांनी केली. सद्याच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी दिली. मात्र अद्यापही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहे. जनसामान्यांकरता काम करणार आघाडीचे सरकार होते. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री आणि देशातील पंतप्रधान हे आपल्या विचारांचे येण्यासाठी या सरकारला पायउतार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी समीर भुजबळ म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात नाशिक लोकसभा मतदारसंघात दृष्टीपथास पडतील असे कामे केली. पिंप्री सैय्यद येथे कृषी टर्मिनल मार्केट मंजूर करून घेतले.तसेच वडगाव पिंगळा येथे शेतकऱ्यांसाठी फूड पार्क मंजूर केला. मात्र या सरकारमुळे हे प्रकल्प रेंगाळले आहे. जी कामे आघाडी सरकारच्या काळात केली ती रद्द करण्याचा घाट या युती सरकारने केला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी हंसराज वडघुले, डॉ.सुनील ढिकले, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, बाळासाहेब म्हस्के, यशवंत ढिकले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Previous articleदक्षिण मध्य मुंबईत कॅांग्रेसचे “क्या हुआ तेरा वादा” आंदोलन
Next articleपहिला टप्प्यासाठी ३ वाजेपर्यंत ४६.१३ टक्के मतदान