नीलेश राणेंसह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल

नीलेश राणेंसह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई नगरी टीम

रत्नागिरी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांच्यासह १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रत्नागिरी येथिल हातखंबा येथे नाकाबंदीच्या वेळेस वाहनांची तपासणी करणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कर्तव्यामध्ये हस्तक्षेप आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केल्याने कोकणातील राजकीय  वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार काल या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन करण्यात आले असून, हे पथक मंगळवारी रात्री पावणे बारा वाजल्यापासून हातखंबा येथे वाहनांची तपासणी करीत होते. त्याच सुमारास रात्री बारा वाजता स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नीलेश राणे हे आपल्या सहकाऱ्यांसह याठिकाणी पोहचले असता पोलीसांनी त्यांची वाहने तपासणीसाठी  थांबवली. मात्र, त्यावेळी नीलेश राणे यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी अश्लील शिवीगाळ तसेच आरडाओरडा करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची धमकी दिली आणि शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला. बेकायदेशीर जमाव गोळा करीत जमावबंदी आदेशाचाही भंग केला, असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे.

त्यात वेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हापया ठिकाणी काय घडले आहे याची माहिती घेण्यासाठी  आले असता  त्यांच्यावर या ठिकाणी असणा-यांनी अंगावर धावून जावून अश्लील भाषेत शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता यामध्ये पोलीसांनी हस्तक्षेप केला असतानाही राणे आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. असेही इंगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४५, १४९, १५१, १५३, १८६, २९४, ३५२, ५०४, ५०६ तसेच सह. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, ११०/११७, ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleयुनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध
Next articleराज्यात पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान