रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागेल अशी स्थिती नाही

रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागेल अशी स्थिती नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील दुष्काळी  स्थिती व त्या भागातील लोकांना मदत तसेच जनावरांना चारा पुरवता यावा यासाठी  लोकसभा निवडणूकीसाठी जारी झालेली आचारसंहिता शिथिल करावी अशी विनंती शासनाने निवडणूक आयोगाला केली असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत येथे दिली. राज्यातील शहरांना रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागेल अशी स्थिती नाही असेही महसूलमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री म्हणाले, आज दुष्काळ  संदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी नियुक्त मंत्रिमंडळ  उपसमितीची बैठक झाली. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जाऊन तेथील स्थानिक आमदारांसह  परिस्थितीचा आढावा  घेणार आहेत.राज्य सरकारने निवडणूक आचारसंहिता जारी होण्यापुर्वीच काही उपाययोजना केल्या होत्या. केंद्र सरकारच्या निकषानुसार 67 लाख  शेतक-यांना मदत पोहचली आहे,. पीकविम्याची रक्कम देखील शेतक-यांना देण्यात येणार आहे. दुष्काळी स्थिती असलेल्या भागात  लोकांना रोजगाराची कामे कमी पडणार नाहीत.जून अखेर पर्यंत दुष्काळी उपाय योजना सुरूच राहातील. रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागेल अशी स्थिती नाही असेही महसूलमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १५ जवानांनाश्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर त्यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती संदर्भात कराव्या लागणा-या  उपाययोजनांचा आणि मदतीचा  आढावा घेतला.

दुष्काळी परिस्थितीची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील १२,११६ गावांमध्ये ४७७४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. २०१६ मध्ये याच सुमारास ९५७९ गावांमध्ये ४६४० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. सध्या सुमारे ८.५ लाख पशुधनासाठी १२६४ चारा छावण्या लावण्यात आल्या आहेत. एकूण ८२ लाख शेतक-यांपैकी ६८ लाख शेतक-यांच्या खात्यात आतापर्यंत ४४१२.५७ कोटी रूपये जमा करण्यात आले.केंद्र सरकारतर्फे दुष्काळ निवारणासाठी ४७१४.२८ कोटी रूपये मदत देण्यात आली. राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात ३४०० कोटी रूपयांची तरतूद केली.  सुमारे ३२०० कोटी रूपये पीक विम्यासाठी देखील देण्यात आले.  यांपैकी ११०० कोटींचे वाटप पूर्ण झाले आहे.पालकमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागात भेटी व चारा छावण्यांनाही भेटी द्याव्या तसेच टँकर्सची स्थिती पाहवी.  त्या  भागातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी उपाय हाती घेण्यात आले असून,रोजगार मुबलक प्रमाणातउपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाऊस विलंबाने आल्यास करावयाच्या उपाययोजनांवरही   आज  बैठकीत चर्चा   झाली असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमराठवाड्याला राज्याच्या अन्य धरणांतून पाणी देण्याची  पंकजा मुंडेंची मागणी 
Next articleऔरंगाबाद मध्ये भाजपाकडून युतीधर्माचेच पालन