औरंगाबाद मध्ये भाजपाकडून युतीधर्माचेच पालन

औरंगाबाद मध्ये भाजपाकडून युतीधर्माचेच पालन

मुंबई नगरी टीम

मुंबई : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी प्रयत्न केले आणि युतीधर्माचे पालन केले असल्याचा खुलासा भाजपाकडून करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्माऐवजी जावई धर्म पाळला, असा आरोप शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला  होता.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता युतीमध्ये असणारी खदखद बाहेर पडण्यास सुरूवात झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांनी थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनाच लक्ष करीत, रावसाहेब दानवे यांनी युती धर्माऐवजी जावई धर्म पाळला, असा आरोप काल केला होता. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी काल  ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादमधील भाजपच्या ८ ते १० नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचे काम केले. जाधव यांनी खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. त्यामुळे रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना आवरा, असे अमित शाहांकडे केलेल्यात तक्रारीत खैरेंनी म्हटले आहे.खैरे यांच्या या आरोपानंतर भाजपाने त्याला उत्तर दिले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेवरून आपण स्वतः या मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करून खैरे यांच्या विजयासाठी भाजपा नेते – कार्यकर्त्यांशी संपर्क केला आणि पत्रकार परिषद घेऊन जाहीर आवाहनही केले, असे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी  सांगितले. स्वतः प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी खा. चंद्रकांत खैरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते असेही आ.ठाकूर म्हणाले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे जावई आ. हर्षवर्धन जाधव या मतदारसंघात उमेदवार आहेत. जाधव यांना  प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा असल्याचा गैरसमज काहीजणांनी निर्माण केला होता. त्याबाबत आपण पत्रकार परिषदेत जाहीरपणे पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आणि संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नये, असे सांगितले. भाजपा संपूर्ण ताकदीने खैरे यांच्या पाठीशी असल्याचे आपण पत्रकार परिषदेतच स्पष्ट केले होते व त्याच्या बातम्याही त्यावेळी प्रसिद्ध झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांना औरंगाबादमध्ये रुग्णालयात दाखल व्हावे लागले. परिणामी ते स्वतः उमेदवार असलेल्या जालना मतदारसंघासाठीही त्यांना फार वेळ देता आला नाही. औरंगाबादमध्ये रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिल्याने मा. प्रदेशाध्यक्षांना निवडणूक प्रचार किंवा भेटीगाठी करता आल्या नाहीत असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Previous articleरेल्वेने पाणी पुरवठा करावा लागेल अशी स्थिती नाही
Next articleमनसेला खर्चाचा तपशिल मागणे केवळ औपचारिकता ?