प्रत्येक जवानाच्या बलिदानाचे उत्तर सरकारला द्यावे लागणार

प्रत्येक जवानाच्या बलिदानाचे उत्तर सरकारला द्यावे लागणार

मुंबई नगरी टीम
पाटोदा : गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले पाटोदाचे सुपूत्र शहीद वीरजवान तौसिफ शेख यांच्या कुटुंबियांची आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे  यांनी भेट देऊन शेख कुटुंबीयांचे सांत्वन केले.

महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात सी-60 चे १५ कमांडो शहीद झाले. जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे हल्ला करण्यात आला त्यात बीडचे सुपूत्र तौसिफ शेखही शहीद झाले होते.  मुंडे यांनी आज शेख कुटुंबियांना भेट देत वीरमाता, वीरपत्नी यांनी दु:खातून सावरत, आपले मनोबल वाढवावे यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी तौसिफ शेख यांचा लहान मुलगा मोहम्मद याला आपल्या मांडीवर घेत त्यांनी या चिमुकल्याला सुद्धा धीर दिला. आपल्या वडिलांसारखं कर्तृत्ववान होण्यासाठी आशीर्वाद दिले. या कुटुंबियांचे दु:ख ऐकताना राज्याच्या सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्याचेही मन गहिवरले.

यावेळी पाटोदा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. जब्बार पठाण यांनी शेख कुटुंबियांच्या वतीने कुरखेडातील १५ शहीद जवानांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले. हे निवेदन स्विकारत धनंजय मुंडे यांनी शहीदांच्या कुटुबियांना न्याय मिळावा यासाठी या घटनेची कसून चौकशी करण्याचे आवाहन सरकारला केले.

महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यात झालेला भ्याड हल्ला राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे. आपले जवानच सुरक्षित नाही तर देश कसा सुरक्षित राहणार? असा सवाल करत त्यांनी फडणवीस सरकारला धारेवर धरले. नक्षलींचा हिंसाचार, सरकारचा फोलपणा खपवून घेतला जाणार नाही. माझ्या प्रत्येक जवानाच्या बलिदानाचे उत्तर सरकारला द्यावे लागणार. येत्या अधिवेशनात जवानांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Previous articleमोदींच्या दावणीला निवडणूक आयोग बांधलाय !
Next articleदुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून राज्याला आणखी २१६० कोटी रुपये