राज ठाकरेंच्या सभांचा सकारात्मक परिणाम
मुंबई नगरी टीम
मुंबई : लोकसभा निवडणूकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेवून भाजपाच्या विरोधात रान उठवले होते. मात्र याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला म्हणावा तसा झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले असले तरी शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचे वक्तव्य केले आहे.
शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर डॉ. कोल्हे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा सकारात्मक परिणाम झाला असल्यामुळेच त्यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर गेलो होतो असे सांगून, या भेटीत कसलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रचार सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात रान पेटविले होते. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत नांदेड, सोलापूर, सांगली, पुणे, रायगड, शिवडी, भांडूप, शिरुर, नाशिकमध्ये सभा घेतल्या होत्या. मात्र यातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाले आहेत.