राज्याला ६ हजार ५९७ टँकर द्यावे लागतायत ; लाज वाटायला हवी सरकारला
मुंबई नगरी टीम
मुंबई : दुष्काळामध्ये तुम्ही राज्यात ६ हजार ५९७ टँकरद्वारे राज्याला पाणीपुरवठा करत होता ही काय भूषणावह गोष्ट आहे का ? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. राज्याला दुष्काळमुक्त करू असे म्हणून तुम्ही सत्तेत आला होतात आणि आता पाच वर्षांनी तुम्हाला राज्याला ६ हजार टँकर रोज द्यावे लागतायेत. कशासाठी स्वतःची पाठ थोपटून घेताय ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे सदस्य जयंत पाटील यांनी सरकारला केला.
हा अर्थसंकल्प केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केला आहे. ऋण काढून सण साजरा करू नये असे आपल्याकडे म्हणतात . मात्र निवडणुकीचा सण साजरा करण्यासाठी आमच्या सरकारने ऋण काढायचे ठरवलंय. एक दोन नव्हे तर या ग्रेट सरकारने २० हजार २९२ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. एवढ्या मोठ्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सुधीरभाऊ, तुम्ही तुमच्या सगळ्या आमदारांना पार्टी दिली पाहिजे. म्हणजे राज्याचं सगळ्यात जास्त वाटोळं करणारा निर्णय तुम्ही घेतला असा जोरदार टोला सरकारला लगावला.
भाजपने आपल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या पण एकाही गोष्टीला यांनी स्पर्श देखील केला नाही. गेल्या पाच वर्षांत किती नवीन सरकारी नोकऱ्या निर्माण झाल्या ? आणि नुकतंच शिक्षण पूर्ण केलेल्या किती तरुण किंवा तरुणींना या नोकऱ्या लागून त्यांनी जॉईन केले ? गेल्या पाच वर्षांत किती नवीन खासगी नोकऱ्या निर्माण झाल्या आणि नुकतंच शिक्षण पूर्ण झालेल्या किती जणांना अशा नोकऱ्या लागल्या ? गेल्या पाच वर्षांत पेट्रोल डिझेलचे दर का कमी झाले नाहीत ?गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात किती नवीन उद्योग उभे राहून ते सुरु झाले ? गेल्या पाच वर्षांत महागाई का कमी झाली नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित करून पाटील यांनी सरकारला भांडावून सोडले.
सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. त्यांच्या ट्विटरवरून अधिकृत आणि वेरीफाइड ट्विटर पेजवरून, अर्थसंकल्पात काय आहे याच्या पोस्ट केल्या जात होत्या. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडले. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प फोडला. आदल्या रात्रीच ग्राफिक्स डिझायनरला हे दिलं म्हणून इतके नीटनेटके ट्विट झाले. याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली. जनतेला फसवण्यासाठी कृत्रिम पावसाची योजना सरकारने आणली मात्र याने जास्त पाऊस पाडता येत नाही. या प्रयोगाला राज्य सरकारने मान्यता दिलीये. जनतेच्या पैशांच कसं वाटोळे करावे हे यांच्याकडून शिकावे असेही पाटील म्हणाले.गेली पाच वर्ष या लोकांनी राज्यात नक्की काय केलं की यांना निवडणुकीच्या तोंडावर नवा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम जाहीर करावा लागतो आहे?असा सवालही त्यांनी केला.धनगर समाज या सरकार सोबत राहण्याचे काही कारणच राहिले नाही. शेवटच्या अधिवेशनातही यांनी धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला नाही.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला सुद्धा एक रुपयाही या अर्थसंकल्पात नाहीये. ज्या अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या स्मारकाला एक रुपया सुद्धा नाहीये, तो अर्थसंकल्प तुम्हाला मान्य आहे का ? अशी विचारणा शिवसेना सदस्यांना पाटील यांनी केली.