पंकजाताईंच्या वाढदिवसाला गावे हायमास्ट दिव्यांनी उजळली
मुंबई नगरी टीम
परळी : राज्याच्या ग्रामविकास महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा दिवशी काल मध्यरात्री एकाच वेळी परळी तालुक्यातील २९ गावे हायमास्ट दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाली. पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या २५१५ योजनेतून सर्व गावांना हायमास्ट दिवे बसविले आहेत. या गावांना अंधारातून प्रकाशात आणल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा वाढदिवस अशा अनोख्या पध्दतीने साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या संकल्पनेतून मतदारसंघात ‘अंधारातून प्रकाशाकडे’ ही योजना राबविली आहे. कोणतेही गांव अंधारात राहू नये हा त्यामागे उद्देश आहे. या योजनेतंर्गत त्यांनी आपल्या २५१५ लेखाशीर्ष मधून ४ कोटी ३८ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेतून मतदारसंघातील १४४ गावांमध्ये प्रत्येक गावांत दोन याप्रमाणे २९२ हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत अंबाजोगाई तालुक्यातील मतदारसंघात येणा-या अकोला, तडोळी, धानोरा, राडी तांडा, राडी, मुडेगाव, दैठणा, वाघाळा( राडी), सेलू अंबा, सातेफळ, सायगाव, सुगाव, नांदगाव परळी तालुक्यातील टोकवाडी, मोहा, लिंबोटा, गडदेवाडी, वंजारवाडी,
सरफराजपूर , करेवाडी, भिलेगाव, वाघाळा परळी, माळहिवरा, गाढे पिंपळगाव, वडखेल, संगम, परचुंडी, तपोवन आदी २९ गावांमध्ये हायमास्ट दिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंकजाताई मुंडे यांनी अतिशय कल्पकतेने मतदारसंघातील सर्व गावांमध्ये अशी योजना राबवून गावांना अंधारातून प्रकाशात आणले, त्यामुळे आनंदित झालेल्या ग्रामस्थांनी देखील त्यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरवले होते आणि काल मध्यरात्री १२ वाजता सर्व गांवातील ग्रामस्थांनी आपापल्या गावांत एकत्र येऊन चौकात लावलेले हायमास्ट दिवे एकाच वेळी प्रकाशमान केले व त्यांना अंतःकरणांतून दीर्घायुष्य आणि भविष्यातील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.