पूरग्रस्त कोल्हापुरात बंदी आदेश म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच

पूरग्रस्त कोल्हापुरात बंदी आदेश म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच

मुंबई नगरी टीम

मुंबई :  प्रचंड महापुराने उद्धवस्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मदतकार्य सुरू असताना बंदी आदेश काढणे ही सरकारची वैचारिक दिवाळखोरी आणि अपयश दडवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान लागू केलेल्या बंदी आदेशावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, मागील काही तासांपासून जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. ही मदतकार्याला गती देण्याची वेळ आहे. राज्यभरातून पूरग्रस्त भागांकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून, गावा-गावात लोकांना एकत्रित करून मदतीचे वितरण करण्याची गरज आहे. मात्र नेमके याच वेळेस सणवाराची सबब सांगून काढलेला हा बंदी आदेश आश्चर्यजनक आहे. लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली जाणार असेल तर मग मदतीचे वितरण कसे करणार? असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर व सांगली या दोन्ही पूरग्रस्त जिल्ह्यात सरकारच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल कमालीचा रोष आहे. वेळीच मदत न मिळाल्याबद्दल पूरग्रस्तांनी अनेक मंत्र्यांसमक्षच संताप व्यक्त केला आहे. पुढील काळातही जनतेचा प्रक्षोभ उफाळून येण्याची शक्यता असल्याने सरकारने बंदी आदेश लागू केले आहेत. मात्र, हे आदेश तातडीने मागे घ्यावेत आणि सरकारने लोकांना सामोरे जाऊन गतीमानतेने मदतीचे वितरण करावे, अशी मागणीही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Previous articleशरद पवार धनंजय मुंडे उद्या  पुरग्रस्त सांगली सातारा भागात
Next articleपूरग्रस्तांचे मदत कार्य सुरळीत होण्यासाठी  जिल्ह्यात बंदीचे आदेश