काँग्रेस राष्ट्रवादी राज ठाकरेंच्या पाठीशी

काँग्रेस राष्ट्रवादी राज ठाकरेंच्या पाठीशी

मुंबई नगरी टीम

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवल्याने आणि विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडल्याने त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे असा आरोप करीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे चित्र आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही मोदी, शाह यांनी सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे. मोदी, शाह ही जोडी लोकशाहीला हरताळ फासून हुकुमशाही पद्धतीने देश चालवत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणा-या प्रत्येकाच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय यांच्या चौकश्या लावल्या जात आहेत. वरिष्ठ काँग्रसे नेते पी. चिदंबरम यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना ही अशाच प्रकारे त्रास देण्यात येत आहे. देशभरातील विरोधी पक्षाचे जे नेते सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवतात त्यांना अशा प्रकारच्या नोटीसा देऊन त्रास दिला जात आहे. मोदी शाह, जोडी संविधानिक  संस्थांचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सरकार विरोधात बोलणा-यांना ईडीच्या नोटीसा पाठवायच्या, देशद्रोही ठरवायचे हाच मोदी शाह यांचा न्यू इंडिया आहे, असे थोरात म्हणाले.

देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे असा आरोप मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. मागील लोकसभा निवडणुकीत, शिवाय राज ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात काही प्रश्न निर्माण करतात, भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण व्हावी म्हणून ही नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आली आहे असेही मलिक यांनी सांगितले. सत्ताधारी विरोधकांना अशाप्रकारे संपवत असतील तर विरोधी पक्षाची जबाबदारी आहे की एकजुटीने याविरोधात एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे असे सांगतानाच आम्ही एकत्र येवू असा विश्वासही  मलिक यांनी व्यक्त केला.देशातील, राज्यातील जनता हे सर्व पहाते आहे. निश्चितच सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या भाजप सरकारला देशातील व राज्यातील जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही मलिक म्हणाले.राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेचा पर्दाफाश केला होता. आवाज उघडला तर तो दाबण्यासाठी खोटी नोटीस पाठवली जात आहे. आघाडी सरकारने असे राजकारण केले असते तर आज भाजपचे ‘भा’ पण शिल्लक उरला नसता आशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या कृतीचा धिक्कार केला आहे.

Previous articleसरकारचा दिलासा देणारा निर्णय : पूरग्रस्त शेतक-यांचे एक हेक्टरपर्यंतचे कर्जमाफ
Next articleदुष्काळग्रस्त मराठवाड्याची सरकारने फसवणूक केली