विधानसभेसाठी शिवसेनेशी युती होणारच : मुख्यमंत्री

विधानसभेसाठी शिवसेनेशी युती होणारच : मुख्यमंत्री

मुंबई नगरी टीम

बीड  : लोकसभा निवडणुकीच्या आधी माध्यमांनी भरपूर चर्चा केली की भारतीय जनता पार्टी – शिवसेना युती होणारच नाही पण आम्ही एका दिवसात युती केली आणि घोषणा केली.आताही विधानसभा निवडणुकीत असेच होईल. तुमच्या लक्षातही येणार नाही, अशी झटपट युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  बीड येथे व्यक्त केला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या दरम्यान बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.  महाजनादेश यात्रेच्या पुढच्या टप्प्यात काही काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक स्वागत करणार आहेत. आम्ही ते स्वीकारणार आहोत. कार्यकर्त्यांच्या बाबतीत भाजपाची ओपन डोअर पॉलिसी आहे तर नेता असेल तर गाळणी लावण्याचे धोरण आहे. आम्ही सगळे नेते पक्षात सामावून घेऊ शकत नाही, पक्षात तेवढी जागाही नाही. जे आवश्यक वाटतात, त्यांच्यासाठी जागा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.महाजनादेश यात्रेचा आतापर्यंत १६४१ किमी प्रवास झाला आहे. साठ विधानसभा क्षेत्रांमध्ये यात्रा गेली आहे. ही यात्रा १५० विधानसभा क्षेत्रांमध्ये व ३२ जिल्ह्यात पोहचणार आहे. यात्रेने विदर्भाचा प्रवास पूर्ण केला आहे, नाशिक – नगरचा काही भाग वगळता बाकी उत्तर महाराष्ट्र पूर्ण झाला आहे. कालपासून यात्रा मराठवाड्यात आली. यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. लोक मागण्या मांडतात आणि समर्थनही देतात कारण त्यांचा विश्वास आहे की, हेच सरकार मागण्या पूर्ण करू शकते असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, अन्य पक्षांच्या यात्रा काढल्या आहेत. त्यांच्या यात्रांना लोकांचा पाठिंबा मिळत नाही. काल काँग्रेसने यात्रा सुरू केली. लोकांची गर्दी नसल्याने काँग्रेसला मंगल कार्यालयात यात्रा सुरू करावी लागली आणि सभा छोट्या हॉलमध्ये घ्यावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेसच्याही दोन यात्रा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा आहे. सुप्रियाताईंनी हा संवाद पंधरा वर्षे सत्तेत असताना केला असता तर ही परिस्थिती आली नसती. सत्तेत असताना त्यांनी केवळ स्वतःशी संवाद केला जनतेशी केला नाही म्हणून जनतेने त्यांना या परिस्थितीत आणले आहे.

त्यांनी सांगितले की, मराठवाड्यात भीषण दुष्काळ स्थिती दिसते. काही जिल्ह्यात दाहकता अधिक आहे. बीड जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला आहे. मोठ्या प्रमाणात पीक करपले जाऊ शकते, असे दिसते. या बाबतीत ज्या उपाययोजना त्या सरकार करणारच आहे. या स्थितीचा प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतो आहोत. हा भाग परतीच्या पावसाचा आहे. परतीच्या पावसाची अजून आशा आहे. तो नीट आला तर काही फायदा होऊ शकतो.

 मुख्यमंत्री  म्हणाले की, जलयुक्त शिवारमुळे चांगले काम झाले आहे. त्यामुळे दुष्काळ असूनही थोडी पिके दिसतात. पण पाऊसच आला नाही तर जलयुक्त शिवारचे साठेही भरू शकत नाहीत. दुष्काळावर शाश्वत उपाययोजना झाली पाहिजे. त्या दृष्टीने वॉटरग्रीड प्रकल्प आणि समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी नदीत आणून मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करायचा हे उपाय सरकार करत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ होईल.

त्यांनी सांगितले की, बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवारचे काम चांगले झाले आहे. लोकसंख्येतील मुलींच्या प्रमाणाच्या बाबतीत बीड जिल्हा मागे होता. पण गेल्या पाच वर्षांत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीमुळे, दर हजारी बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ८०० वरून ९३६ वर आले आहे व बीड जिल्हा प्रगत जिल्ह्यांच्या रांगेत आला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न असलेल्या नगर बीड परळी रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण झालेले पहायला मिळेल. मराठवाड्याकरता आमच्या सरकारने जेवेढे निर्णय घेतले तेवेढे कोणी घेतले नाहीत. मराठवाड्याला हिश्श्याचे कृष्णेचे पाणी देणे, वॉटरग्रीड, समृद्धी महामार्ग, डीएमआयसी अशी अनेक कामे मराठवाड्याच्या विशेष लाभाची आहेत.

ते म्हणाले की, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांसाठी आपल्याच सरकारने निर्णय घेतला. आधीच्या सरकारने कधीही अनुदान मागणार नाही असे प्रतिज्ञापत्र शाळांकडून घेतले होते. आम्ही वीस टक्के अनुदान दिले, टप्प्या टप्प्याने पुढचे अनुदान देऊ. दुसरा तिसरा टप्पा प्रक्रियेत आहे. आम्ही शब्द दिला आहे.

Previous articleसरकारचा मोठा निर्णय : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ
Next article… तर त्यांना विधानसभेत पोचू देणार नाही : जयंत पाटील