शिवसेनेची स्वबळाची चाचपणी ?

शिवसेनेची स्वबळाची चाचपणी ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाचे जे  झाले तेच आरेमधील मेट्रो कारशेडचेही होणार असल्‍याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडला शिवसेनेचा तीव्र विरोध असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ज्‍या मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांचे अर्ज येत आहेत त्‍या सर्वांचा विचार करण्यात येत असल्‍याचे सांगतानाच शिवसेना स्‍वबळाची चाचपणी करत असल्‍याचे अप्रत्‍यक्ष संकेत त्‍यांनी आज दिले आहेत.

आज मुंबईतील पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख बोलत होते.कोकणातील नाणार प्रकल्पाला जे झाले तेच आरेमधील मेट्रो कारशेडचेही होणार असे त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कोणत्‍या जागेसाठी मुलाखती सुरू आहेत याची माहिती अद्याप मला नसून,ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर त्‍याचा मी आढावा घेईन असे त्यांनी सांगून ठाकरे यांनी सांगून, विधानसभेच्या सर्व जागांवर शिवसेनेची चाचपणी सुरू असल्‍याचेच त्‍यांनी संकेत दिले. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्‍तानची स्‍तुती करणारे वक्‍तव्य नुकतेच केले आहे.त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही.सर्वसामान्य जनतेला वाटते तेच मलाही वाटते.लोकसभा निवडणुकीत यामुळेच त्यांचा पराभव झाला होता. आमच्यासाठी देशभक्ती सर्वोच्च असल्याचेही ते यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानला योग्य धडा शिकवला होता.पण त्यांना आता केवळ शब्दांनी निषेध करू चालणार नसून, एक दोन डोस वाढवून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.सामनातील अग्रलेखात कोणाचाही अपमान करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून राममंदिराबाबत शिवसेना पहिल्‍या दिवसापासून आग्रही आहे.बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी घेतली होती.न्यायालयात हा खटला आता अंतिम टप्प्यात असून,न्यायालयावर आमचा विश्वास आहे.पण आता किती दिवस वाट पहायची? कलम ३७० प्रमाणेच केंद्र सरकारने या विषयावरही धाडसी पाउल उचलावे असेही ते म्‍हणाले.राममंदिराची पहिली वीट रचण्याची संधी मिळाली तर तो आमचा बहुमानच असेल असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

Previous articleनिवडणुकीच्या तोंडावर १९३ वस्तूंवरील कर दरात घट
Next articleसत्ता आल्यास आशा स्वयंसेविकांच्या मानधनात ५ हजार रुपयांची वाढ