चौदा महिन्यात घरांच्या किंमती आवाक्यात आणल्या

चौदा महिन्यात घरांच्या किंमती आवाक्यात आणल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई  : आपल्या चौदा महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत म्हाडाच्या घरांच्या किंमती २० ते ३० टक्क्यांनी कमी करुन घरे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचा दावा म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केला.म्हाडाच्या जागेत अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. सद्यस्थितीत अशी किती ठिकाणे आहेत, हे सांगता येणार नाही. ज्या ठिकाणी अशा प्रकारे अतिक्रमण आढळून आले, त्या विरोधात म्हाडाकडून कारवाई करण्यात येत आहे. यासह अशा किती ठिकाणी म्हाडाच्या जागेत अतिक्रमण आहे, याचा खाजगी एजन्सी नेमून शोध घेण्यात येणार आहे. याविषयी निविदा प्रक्रिया चालू असल्याचे म्हाडाचे अध्यक्ष सामंत म्हणाले.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत बोलत होते. खाजगी विकासकाप्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करण्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. ९० टक्के विकासक लाभार्थींना भाडे देत नाहीत; मात्र म्हाडाकडून आधीच भाडे देण्यात येते. बाजारभाव लक्षात घेऊन म्हाडाकडून भाडे देण्यात येत आहे. म्हाडाच्या कामाविषयी लोकांमध्ये विश्‍वास निर्माण करणे आवश्यक आहे, तसा विश्‍वास निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हाडाची विश्‍वासाहर्ता वाढण्यासाठी एखादा चांगल्या प्रकारचा प्रकल्प उभा करणे आवश्यक आहे. त्यातून आम्ही म्हाडाची ओळख निर्माण करू असेही सामंत म्हणाले.

आपल्या चौदा महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत म्हाडाच्या घरांच्या किंमती २० ते ३० टक्क्यांनी कमी करुन घरे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचे ते म्हणाले. म्हाडाच्या घरांच्या किंमती काहीवेळेस बाजारभावापेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर काही ठिकाणच्या घरांच्या किंमती या कमी करण्यात आल्या. त्यामुळे या घरांच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत पुढील काळात म्हाडाच्या घरांचा साठा वाढविण्यावरही भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हाडाकडे मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या जमीनींचा पुनर्विकास करण्याचे काम आले आहे. या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन रहाणा-यांना दिलासा देण्यासाठी म्हाडा या पुनर्विकासाला गती देईल. खाजगी विकासकाप्रमाणे चांगल्या दर्जाचे काम करण्याकडेही आमचा कल आहे. म्हाडाच्या इमारतींचाही पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. खाजगी विकासक रहिवाशांना अधिक लाभाची अमिषे दाखवून पुनर्विकासाचे काम मिळवितात. मात्र, नंतर ९० टक्के विकासक ही कामे रखडविता. रहिवाशांना भाडे देखील मिळत नाही. त्यामुळे म्हाडाने पुनर्विकास केल्यास सर्वसामान्यांची फसवणूक टळेल, असे सामंत म्हणाले.

गेल्या १४ महिन्याच्या कार्यकाळात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत.म्हाडाला नावलौकिक मिळवून देण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रमाणिक प्रयत्न त्यांनी म्हाडाचे अध्यक्ष म्हणून केला आहे. राज्यातील पत्रकारांना म्हाडाच्या माध्यमातून घरे देण्याचा निर्णयही त्यांच्याच कार्यकाळात घेण्यात आला आहे.मुंबई आणि ठाण्यातील पत्रकारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल पत्रकारांच्यावतीने त्यांचे पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त करण्यात आले. म्हाडाबाबत लोकांचा विश्वास परत मिळवण्यात नक्कीच यश मिळवले असा विश्वासही त्यांनी यावेळी  व्यक्त केला.

Previous articleमुख्यमंत्री फक्त मंत्र्यांचे पगार काढण्याचे काम करतात
Next articleनाठाळ बैलांना मतदानाच्या दिवशी बाजार दाखवा : शरद पवार