आयात उमेदवार देणाऱ्या भाजपने फुकटचा सल्ला देऊ नये

आयात उमेदवार देणाऱ्या भाजपने फुकटचा सल्ला देऊ नये

मुंबई नगरी टीम

मुंबई : माझ्याविरोधात लढण्यासाठी निष्ठावंत सोडून उमेदवाराची आयात करणाऱ्या भाजपने मला फुकटचा सल्ला देऊ नये, या शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा समाचार घेतला आहे.

तावडे यांनी मंगळवारी नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढू नये, असा अनाहूत सल्ला दिला होता. त्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असताना चव्हाण यांनी तावडे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवते. पण या भाजपला काँग्रेसविरूद्ध लढण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते मिळत नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारने उत्तम काम केल्याचा दावा भाजप करते. मात्र त्या कामाच्या बळावर आपले निष्ठावान कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरविण्याऐवजी भाजपला उमेदवारांची पळवापळवी करावी लागते, याची तावडे यांनी अधिक काळजी केली पाहिजे. काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्यावी, हा काँग्रेसचा प्रश्न आहे. विनोद तावडे यांनी त्यामध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. त्यापेक्षा त्यांनी भाजपमध्ये होणाऱ्या बंडाळीवर लक्ष दिले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. विरोधी पक्षांनी निवडणूक लढवू नये, असे सांगणारे हे सरकार लोकशाहीचा अवमान करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

Previous articleउरलेली पत वाचवण्यासाठी अशोक चव्हाणांनी निवडणूक लढवू नये
Next articleसातारा पोटनिवडणुकीसाठी दोन वेगवेगळी स्टिकर असेलेली मतदान यंत्रे