राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

मुंबई नगरी टीम

बीड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. नमिता मुंदडा यांच्या भाजपा प्रवेशामुळे बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.नमिता मुंदडा यांनी आज बीडमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुंदडा यांना केजमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.  नमिता मुंदडा यांना केज मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारी जाहीर होवून त्यांनी राष्ट्रवादीचे चिन्ह न लावता समाज माध्यमातून प्रचाराला सुरूवात केली होती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला होता. आज त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेवून भाजपात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवले. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीपुढे नतमस्तक होत भाजपात प्रवेश केला केला. नमिता मुंदडा या राज्याच्या माजी मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर त्यांनी २०१४ मध्ये केजमधून निवडणूक लढवली होती. भाजपच्या संगीत ठोंबरे यांनी त्यांना पराभव केला होता.

Previous articleशिवसेना भाजपच ठरलं ! युतीची घोषणा होणार
Next articleचंद्रकांत पाटील कोथरूड मधून निवडणुक लढवणार