शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक ही चूकच!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक ही चूकच!

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या हट्टापायी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यात आल्याचे अप्रत्यक्ष जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना अटक करणे ही चूकच होती, असेही ते म्हणाले.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने पाठवलेल्या नोटिसीचा समाचार घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना २००० साली झालेल्या अटकेची आठवण करून दिली. ही अटक म्हणजे सुडाचे राजकारण होते, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, त्यावेळी माझे व काही सहकाऱ्यांचे मत होते की शिवसेनाप्रमुखांच्या बाबतीत टोकाचे राजकारण कोणी करू नये. पण आमचे मत कोणी विचारात घेतले नाही. काहीजणांच्या हट्टापायी ती अटक केली गेली.  २००० साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते तर छगन भुजबळ गृहमंत्री होते. त्यामुळे अजित पवार यांनी भुजबळांचे नाव न घेता केलेल्या खुलाशामुळे भुजबळांना अडचणीत आणल्याची चर्चा आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत घेण्याची राष्ट्रवादीची  इच्छा होती. मात्र काँग्रेसमुळे त्यांना आघाडीत घेता आले आहे. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटते. राज ठाकरे यांच्या पक्षाला आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. काँग्रेस सोडून इतर मित्रपक्षांचा त्यास पाठींबा होता. परंतु काँग्रेसने मात्र त्यास विरोध केला, असे पवार म्हणाले.

Previous articleराहुल गांधींची १३ तारखेला चांदिवलीत भव्य प्रचारसभा
Next articleअटकेपार झेंडा लावणाऱ्या महाराष्ट्राची  काय अवस्था करुन ठेवलीय